Nikhil Chaudhary in BBL 2024 : भारतीय वंशाचा क्रिकेटपटू निखिल चौधरी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) चमकत आहे. निखिल चौधरी आक्रमक फलंदाज आहे, सोबतच तो त्याच्या देसी अंदाजासाठीही चर्चेत असतो. ऑस्ट्रेलिन क्रिकेट चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.
बीबीएलसारख्या (BBL) स्पर्धेत भारतीय वंशाच्या खेळाडूची एवढी चर्चा होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. पण निखिल चौधरी आज जिथे पोहोचला आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.
निखिल चौधरी हा पंजाबकडून अंडर-१९ क्रिकेट खेळलेलाआहे. पण त्याला भारतात अधिक संधी मिळणार नाही असे वाटले, तेव्हा तो ऑस्ट्रेलियाला गेला. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने सतत मेहनत घेतली. पण परदेशात संधी मिळणे त्याहून अवघड होते, पण निखिलने हार मानली नाही.
निखिल चौधरीला बीबीएलमध्ये पहिल्यांदाच होबार्ट हरिकेन्सचा करार मिळाला. यापूर्वी तो ऑस्ट्रेलियातील काही क्लबसाठी क्रिकेट खेळला आहे. होबार्ट हरिकेन्सला दिलेल्या मुलाखतीत निखिल चौधरीने तो बीबीएलमध्ये कसा पोहोचला हे सांगितले आहे.
निखिलने सांगितले की, जेव्हा तो भारतातून ऑस्ट्रेलियाला आला तेव्हा त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. मग त्याने मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली, परंतु लवकरच त्याला ही नोकरी सोडावी लागली. कारण त्याला चाकूने भाजी कशी कापायची हे माहित नव्हते. यात त्याची बोटांनाही अनेक वेळा दुखापती झाल्या.
अशा परिस्थितीत जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली तेव्हा त्याच्या आईच्या सांगण्यावरून निखिलने रेस्टॉरंटमधील नोकरी सोडली आणि नंतर कुरिअर बॉय बनून घरोघरी सामान पोहोचवायला सुरुवात केली.
निखिलने कुरिअर बॉयचे काम २ वर्षे केले. यावेळी तो वेळ काढून क्रिकेटही खेळत राहिला. निखिलने सांगितले की त्याला फक्त तीन महिन्यांपूर्वी BBL करार मिळाला होता त्यानंतर तो आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळत आहे.
याशिवाय त्याने आपल्या देसी स्टाईल सेलिब्रेशनबद्दलही मोकळेपणाने सांगितले. निखिलने सांगितले की तो मांडी थोपटल्यानंतर हात वर करतो. खरे तर हे कबड्डी या खेळात केले जाते. क्रिकेटशिवाय निखिलला लहानपणापासूनच कबड्डी खेळण्याचीही आवड होती. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनही क्रिकेटच्या मैदानावर अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करतो.