इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी पंजाब किंग्ज यांच्या मालकांमध्ये सर्व काही ठीक नाही. पंजाब किंग्ज संघात एकूण ४ भागधारक आहेत. पण आता शेअर्सच्या वितरणाबाबत या मालकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी प्रीती झिंटा कोर्टात गेली आहे. प्रीती झिंटाची KPH ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पंजाब किंग्ज फ्रँचायझीमध्ये २३ टक्के भागीदारी आहे. या संघात प्रिती झिंटा व्यतिरिक्त नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल यांचा समावेश आहे.
प्रितीने कोर्टात मोहित बर्मनविरोधात प्रतिबंधात्मक आदेश देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत मोहित बर्मन कोण आहेत? हे जाणून घेऊया.
मोहित बर्मन हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मोहित बर्मन हे डाबर इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा व्यवसाय देशाबरोबरच परदेशातही पसरलेला आहे. मोहितने रिचमंड अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे आणि डाबर व्यतिरिक्त ते अविवा लाइफ इन्शुरन्सचे मालक आहेत.
मोहित बर्मन यांचे व्यावसायिक कुटुंब भारतातील टॉप-२० श्रीमंत कुटुंबांमध्ये येते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ७७ हजार कोटी रुपये आहे. मोहित बर्मन एक व्यापारी असून त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला.
मोहित बर्मन हे पंजाब किंग्सचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर आहेत. पंजाब किंग्जमध्ये त्यांच्याकडे ४८ टक्के, तर प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे प्रत्येकी २३ टक्के हिस्सा आहे. उर्वरित मालकी करण पॉल यांच्याकडे आहे.
पंजाब किंग्जमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी असलेले मोहित बर्मन संघातील आपल्या शेअर्सपैकी काही शेअर्स दुसऱ्या एका पार्टीला विकण्याचा विचार करत आहेत. हे थांबवण्यासाठी प्रीती झिंटाने कोर्टात धाव घेतली आहे.
मोहित बर्मन यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेअर्स विकण्याची कोणतीही योजना नाही. तथापि, बर्मन आपला ११.५ टक्के भागभांडवल एका अज्ञात पार्टीला विकण्याचा विचार करत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. बर्मन हे संचालक मंडळातील एक सदस्ये आहेत.