बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया एका शिबिराचे आयोजन करणार आहे. या शिबिरात भारतीय संघ आपली तयारी करणार आहे. अशा परिस्थितीत २१ वर्षांच्या एका फिरकीपटूला टीम इंडियाने खास बोलावून घेतले आहे, तो या शिबिरात टीम इंडियाच्या फलंदाजांना गोलंदाजी करेल.
हिमांशू सिंग असे या फिरकी गोलंदाजाचे नाव असून तो भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरात सहभागी होणार आहे.
बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये ऋषभ पंतचे पुनरागमन झाले. तसेच, वेगवान गोलंदाज यश दयाल याचा पहिल्यांदाच संघात समावेश करण्यात आला. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जसजशी जवळ येत आहे तसतशी तयारी जोरात सुरू आहे. पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला होणार आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी १२ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे संघ शिबिरासाठी एकत्र येणार आहे. बीसीसीआयने या महत्त्वाच्या शिबिरासाठी मुंबईचा युवा फिरकी गोलंदाज हिमांशू सिंग याला बोलावले आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने हिमांशूला शिबिरात सामील होण्यास सांगितले आहे, जिथे त्याला भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करण्याचे काम दिले जाऊ शकते.
अवघ्या २१ वर्षांचा हिमांशू मुंबईसाठी क्रिकेट खेळतो. थिम्पिया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये, हिमांशूने आंध्रविरुद्ध मुंबईसाठी ७४ धावांत ७ बळी घेतले होते.
यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगकर यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. हिमांशूच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे त्याची निवड करण्यात आली आहे. हिमांशूची ॲक्शन भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनच्या बॉलिंग ॲक्शनसारखीच आहे.
हिमांशूला अद्याप वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही, परंतु तो मुंबईच्या १६ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील संघाचा भाग राहिला आहे. याव्यतिरिक्त, हिमांशू काही वर्षांपूर्वी अनंतपूर आणि बेंगळुरू येथे आयोजित बीसीसीआयच्या 'इमरजिंग प्लेयर' शिबिराचा भाग होता.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.