IND W vs SA W U19 Final 2025 : भारताने महिला अंडर-१९ टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट राखून पराभव केला. भारताच्या विजयात गोंगडी त्रिशा हिचा सिंहाचा वाटा आहे.
गोंगडी त्रिशाने वर्ल्डकप फायनलमध्ये गोलंदाजीत ३ विकेट घेतल्या आणि त्यानंतर फलंदाजीत नाबाद ४४ धावा केल्या. त्रिशाने केवळ फायनलमध्येच नाही तर या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली. ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
एवढेच नाही तर महिलांच्या अंडर-१९ टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिले शतक झळकावण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. या स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती असून गोंगडी त्रिशापूर्वी कोणीही या स्पर्धेत शतक केलेले नव्हते. २०२३ मध्ये पहिल्यांदा महिलांचा अंडर १९ ची-20 वर्ल्डकप खेळला गेला होता. त्यावेळी भारताने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती.
गोंगडी त्रिशाने या स्पर्धेत ७ डावात ७७ पेक्षा जास्त सरासरी आणि १४७ च्या स्ट्राईक रेटने ३०९ धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. गोंगडीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४ धावा केल्या होत्या. यानंतर मलेशियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद २७ धावा, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४९ धावा, बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात ४० धावा आणि स्कॉटलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात नाबाद ११० धावा केल्या होत्या.
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारी ती केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पहिली आणि एकमेव खेळाडू ठरली.
यानंतर गोंगडी त्रिशाने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ३५ धावांची खेळी केली होती. तर अंतिम फेरीत नाबाद ४४ धावा करून तिने भविष्यातील स्टार असल्याचे सिद्ध केले.
गोंगडी त्रिशाचा जन्म १५ डिसेंबर २००५ रोजी तेलंगणाच्या निजामाबाद येथे झाला. निजामाबाद येथील स्थानिक शाळेत तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. कुटुंबाच्या पाठिंब्याने गोंगडीने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अशा स्थितीत त्रिशाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. आपल्या कौशल्य आणि मेहनतीमुळे तिने लवकरच राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तिने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्रिशा गोंगडी ही उजव्या हाताचा फलंदाज आहे, जी तिच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जाते. ती मैदानवर सर्वत्र फटके खेळण्यास सक्षम आहे आणि तिची टेक्निकही अत्यंत मजबूत आहे.
गोंगडी त्रिशा तिच्या खेळावर प्रभाव टाकण्याचे श्रेय तिची आदर्श आणि महान क्रिकेटर मिताली राजला देते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये गोंगडी त्रिशा म्हणाली होती, की “मी मिताली दीदीला पाहत मोठी झाले आहे आणि ती ज्या पद्धतीने डावाचे नेतृत्व करते ते मला आवडते. मला हे नेहमी करायचे होते. ती नेहमीच माझी आयडॉल राहिली आहे. शतकाबाबत ती म्हणाली, ‘हो, माझ्यासाठी ते खरोखरच खास आहे. मला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावायचे होते, पण मला दुसरी संधी मिळाली’.
संबंधित बातम्या