Who Is Dhruv Jurel : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. शुक्रवारी (१२ जानेवारी) या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी युवा खेळाडू ध्रुव जुरेल याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव पहिल्यांदाच टीम इंडियात आला आहे.
यूपीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ध्रुव जुरेल सध्या भारत अ संघाकडून खेळत आहे. या २२ वर्षीय फलंदाजाने आयपीएलमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
ध्रुव जुरेल हा मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव नेमसिंह जुरेल आहे. वडिलांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग होता.
सुरुवातीला ध्रुवलाही भारतीय सैन्यात भरती होऊन आपल्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करायची होती, परंतु क्रिकेटच्या आवडीमुळे तो ते करू शकला नाही. ध्रुव भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो.
ध्रुव जुरेल भारताकडून अंडर-१९ विश्वचषक खेळला आहे. २०२० मध्ये झालेल्या स्पर्धेत तो यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग होता. बांगलादेशविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता.
आयपीएलमध्ये ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. २०२२ च्या लिलावात त्याला संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले.
ध्रुवने २०२२ मध्ये यूपीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या १९ डावांमध्ये त्याने ४६ च्या सरासरीने ७८० धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी २४९ धावांची आहे.
त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अ संघाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ७ डावात ४७ च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. T20 बद्दल बोलायचे झाले तर त्याने १३७ च्या स्ट्राईक रेटने २४४ धावा केल्या आहेत.