सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये आज (५ डिसेंबर) बडोदा आणि सिक्कीम यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात बडोद्याने इतिहास रचला. त्यांनी टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून विक्रमी ३४९ धावा केल्या.
बडोद्याने आपल्या डावात एकूण ३७ षटकार ठोकले. यापैकी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भानू पानियाने १५ षटकार ठोकले. या फलंदाजाने सिक्कीमच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यानंतर भानू पानिया नेमका कोण आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
भानू पानियाने ५१ चेंडूत नाबाद १३४ धावा केल्या. भानूने १५ षटकारांशिवाय ५ चौकारही लगावले. भानूने केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर २० चेंडूत ११० धावा केल्या.
या डावात त्याचा स्ट्राइक रेट २६२.७५ इतका होता. भानू पानियाने २० चेंडूत अर्धशतक आणि ४२ चेंडूत शतक पूर्ण करून त्याची प्रतिभा सिद्ध केली.
भानू पानिया हा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज आहे, ज्याने २०२१ मध्ये बडोद्याकडून लिस्ट ए आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. तो २८ वर्षांचा असून त्याचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. सिक्कीमविरुद्धचे शतक हे त्याचे पहिले टी-20 शतक होते आणि त्यापूर्वी त्याची सर्वोत्तम धावसंख्या फक्त ५५ धावा होती.
सिक्कीम विरूद्धच्या सामन्यापूर्वी , ३५ सामन्यांमध्ये त्याची टी20 मध्ये सरासरी २५.६१ होती आणि त्याने १३५.६८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याची लिस्ट ए सरासरी फक्त २१ आहे.
मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू मोसमात कर्नाटक, सौराष्ट्र आणि तामिळनाडूविरुद्ध चांगली खेळी केल्यानंतर त्याने आता सिक्कीमविरुद्ध चमकदार कामगिरी केली.
भानू पानिया व्यतिरिक्त, शिवालिक शर्मा आणि विष्णू सोलंकी यांनीही या सामन्यात धुमाकूळ घातला आणि झटपट अर्धशतके झळकावून बडोद्याला T20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात मदत केली. प्रत्युत्तरात सिक्कीमला केवळ ८६ धावा करता आल्या आणि बडोद्याने २६३ धावांनी मोठा विजय नोंदवला.