Beau Webster debut vs india in sydney : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची अंतिम आणि पाचवी कसोटी सिडनी येथे आजपासून (३ जानेवारी) सुरू झाली. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात १८५ धावांवरच गारद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने १ बाद ९ धावा केल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला. ऑलराऊंडर मिचेल मार्श याच्या जागी ब्यु वेबस्टर याला संघात घेतले. ३१ वर्षांचा वेबस्टर हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. वेबस्टर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट घेत आहे आणि धावा करत आहे. वेबस्टर हा उजव्या हाताचा फलंदाज तसेच वेगवान गोलंदाज आहे.
पर्थ कसोटीनंतर वेबस्टरचा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. मिचेल मार्शला बरगडीला दुखापत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात सामील करण्यात आले.
ब्यू वेबस्टरने अलीकडेच शेफिल्ड शील्ड देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. शेफिल्ड शील्ड स्पर्धेच्या मागील हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.
या काळात त्याची सरासरी ५८.६२ होती. याशिवाय, त्याने आपल्या गोलंदाजीसह एकूण ३० विकेट्स घेतल्या, सर गारफिल्ड सोबर्सनंतर एका मोसमात ९०० धावा आणि ३० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा वेबस्टर हा दुसरा खेळाडू आहे.
३१ वर्षीय ब्यू वेबस्टरने या मोसमात शेफिल्ड शिल्डच्या ४ सामन्यात ३०३ धावा केल्या. या कालावधीत त्याची फलंदाजीची सरासरी ५०.५० होती. वेबस्टरने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. त्याने चार सामन्यांमध्ये ९६.५ षटके टाकली ज्यात त्याने ९ विकेट घेतल्या.
याशिवाय वेबस्टरने डीन जोन्स ट्रॉफीच्या ५० षटकांच्या सामन्यात १७ धावांत ६ बळी घेतले, तर तस्मानियाच्या या खेळाडूने भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळताना नाबाद अर्धशतक झळकावले होते. त्याने भारत अ संघाविरुद्ध दोनदा प्रत्येकी ३ बळी घेतले.