अंशुल कंबोज याने रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात सर्व १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल हरियाणाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि केरळविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली.
अंशुल कंबोज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे, परंतु त्याला आयपीएल २०२५ साठी एमआय फ्रँचायझीने कायम ठेवलेले नाही.
अंशुलच्या आधी बंगालच्या प्रेमांगशु चटर्जी आणि राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी एकाच डावात १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
अंशुलने केरळविरुद्धच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ३०.१ षटके टाकली, ज्यात तो ४९ धावांत सर्व १० बळी घेण्यात यशस्वी ठरला. हरियाणा विरुद्ध केरळ सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अंशुलने ८ विकेट घेतल्या होत्या, तर तिसऱ्या दिवशी सकाळी त्याने बासिल थम्पी आणि नंतर शॉन रॉजर यांचे विकेट घेत केरळला २९१ धावांवर रोखले.
याआधी हरियाणासाठी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी जोगिंदर शर्माच्या नावावर होती. २००४-२००५ च्या मोसमात जोगिंदरने विदर्भाविरुद्ध एका डावात ८ विकेट घेतल्या होत्या. अंशुल यावर्षी आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता.
त्याने ३ सामने खेळले आणि २ बळीही घेतले. पहिल्या सत्रातील त्याच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. अंशुल हरयाणाच्या कर्नालचा रहिवासी आहे आणि त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १८ सामने खेळले आहेत आणि ४७ बळी घेतले आहेत.
अंशुल कंबोज अलीकडेच इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये भारत अ संघाकडून खेळताना दिसला. दुलीप ट्रॉफी २०२४ मध्येही त्याने आपल्या अप्रतिम कामगिरीने खळबळ उडवून दिली. दुलीप ट्रॉफी दरम्यान त्याने एकाच डावात ८ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
हरियाणा विजय हजारे ट्रॉफीमध्ये गतविजेता आहे आणि अंशुल कंबोजने १० सामन्यांत १७ बळी घेत आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.