मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Aaron Jones : जोफ्रा आर्चरचा शेजारी, पॉवेल-पूरनसोबत क्रिकेट शिकला… अमेरिकेचा सिक्सर किंग ॲरॉन जोन्स कोण आहे? वाचा

Aaron Jones : जोफ्रा आर्चरचा शेजारी, पॉवेल-पूरनसोबत क्रिकेट शिकला… अमेरिकेचा सिक्सर किंग ॲरॉन जोन्स कोण आहे? वाचा

Jun 03, 2024 04:13 PM IST

Who Is Aaron Jones : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने १७ षटकात सामना जिंकला. जोन्सने या सामन्यात ९४ धावा केल्या.

Aaron Jones : जोफ्रा आर्चरचा शेजारी, पॉवेल-पूरनसोबत क्रिकेट शिकला… अमेरिकेचा सिक्सर किंग ॲरॉन जोन्स कोण आहे? वाचा
Aaron Jones : जोफ्रा आर्चरचा शेजारी, पॉवेल-पूरनसोबत क्रिकेट शिकला… अमेरिकेचा सिक्सर किंग ॲरॉन जोन्स कोण आहे? वाचा

T20 World Cup 2024, Aaron Jones : काही तासांपूर्वीपर्यंत जरी ॲरॉन जोन्स हे नाव संपूर्ण जगाला अनोळखी होते. पण आता या नावाची ओळख संपूर्ण क्रिकेट जगताला झाली आहे. ॲरॉन जोन्स हा अमेरिकेचा सलामीवीर आणि तुफानी फलंदाज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या अमेरिकन संघाच्या या फलंदाजाने सलामीच्या सामन्यातच अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. ॲरॉन जोन्सने टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या पहिल्याच सामन्यात १० षटकारांचा पाऊस पाडला आणि महान फलंदाज ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

वास्तविक, टी-20 वर्ल्डकप २०२४ चा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने १७ षटकात सामना जिंकला. जोन्सने या सामन्यात ९४ धावा केल्या.

ॲरॉन जोन्स कोण आहे?

दरम्यान, हा ॲरॉन जोन्स कोण आहे? तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला ॲरॉन जोन्स एकेकाळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा सहकारी खेळाडू होता. त्याच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टींचा उलगडा आपण येथे करणार आहोत.

ॲरॉन जोन्स बार्बाडोसमध्ये क्रिकेट शिकला

ॲरॉन जोन्सने आपल्या पदार्पणाच्या T20 विश्वचषक सामन्यात १० षटकार मारून ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. ॲरॉन जोन्स जरी यूएसए संघाकडून खेळत असला तरी त्याने जे काही क्रिकेट शिकले आहे ते बार्बाडोसमध्ये शिकले आहे. बार्बाडोसमध्ये तो शाई होप, निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांच्यासोबत खेळून मोठा झाला.

याव्यतिरिक्त, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर बार्बाडोसच्या पूर्वेकडील सेंट फिलिप्स पॅरिशमध्ये जोन्सचा शेजारी होता. याचा अर्थ असा की बार्बाडोस हा बहुधा एकमेव देश असेल जिथून येणारे खेळाडू वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि आता अमेरिका अशा आंतरराष्ट्रीय संघांसाठी खेळतात.

जोफ्रा आर्चरचा बालपणीचा मित्र

जोन्सने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. पण आता त्याच्या स्वप्नांची सुरुवात झाली आहे.

न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जोन्स ३ वर्षांचा असताना परत बार्बाडोसला गेला. इथेच त्याची आर्चरशी भेट झाली. दोघेही एकाच शाळेत शिकले. एकत्र क्रिकेट शिकले. आजही जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते एकत्र वेळ घालवतात.

ॲरॉन जोन्सने केली ख्रिस गेलची बरोबरी

ॲरॉन जोन्सने या सामन्यात १० षटकार मारून कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलची बरोबरी केली. २००७ टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावांच्या खेळीत १० षटकार मारले होते. तथापि, टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक ११ षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे, जो त्याने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता.

ॲरॉन जोन्स सहयोगी संघाचा पहिला फलंदाज

आजपर्यंत टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात सहयोगी संघातील एकाही फलंदाजाने १० षटकार मारले नाहीत. ही कामगिरी करणारा ॲरॉन जोन्स पहिला फलंदाज ठरला. इतकंच नाही तर जोन्स अमेरिकेसाठी टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४