भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने खेळले गेले असून मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. आता या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
मालिकेतील पहिल्याच सामन्यात पदार्पण करणाऱ्या नॅथन मॅकस्विनी याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज सॅम कोन्स्टास याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत १९ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज कोन्स्टास उस्मान ख्वाजासोबत ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
सॅम कोन्स्टासने भारताविरुद्ध शतक ठोकले होते
सॅम कोन्स्टासने नुकतेच भारताविरुद्ध शतक झळकावले होते. पिंक बॉल कसोटीपूर्वी भारताने पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळला होता.
कॉन्स्टासने त्या सामन्यात १०७ धावांची इनिंग खेळली होती. सलामीवीर फलंदाजी करताना त्याने ९७ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकार मारला. त्या सामन्यात पंतप्रधान इलेव्हनच्या टॉप-८ मधील केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले होते.
१९ वर्षीय सॅम कॉन्स्टास याने यावर्षी १७ डिसेंबर रोजी बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले. सिडनी थंडर्सकडून खेळताना त्याने ॲडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध केवळ २० चेंडूत अर्धशतक केले.
बिग बॅश लीगमध्ये अर्धशतक ठोकणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याच वेळी, थंडर्ससाठी लीग इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतकही ठरले. त्याने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.
यंदाच्या अंडर-१९ विश्वचषकात सॅम कोन्स्टास ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. आतापर्यंत त्याने ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने ७१८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर १० धावा आहेत आणि टी-20 मध्ये त्याने ५६ धावा केल्या आहेत. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळतो. ऑक्टोबरमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या दोन्ही डावात कोन्स्टासने शतके झळकावली होती.
शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
संबंधित बातम्या