भारतीय क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे. आत्तापर्यंत अनेक महान भारतीय क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पण आपण येथे अशा एका खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत. ज्याने क्रिकेटसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे बलिदान दिले.
एम जे गोपालन असे या खेळाडूचे नाव आहे. गोपालन यांनी क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही खेळांमध्ये ते चांगले होते आणि दोन्ही खेळ ते एकत्र खेळत राहिले. पण १९३६ मध्ये एक असा प्रसंग आला जेव्हा त्यांना हॉकी आणि क्रिकेट यातील एक खेळ निवडावा लागला. त्यांनी क्रिकेटची निवड केली.
वास्तविक, सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आणि हा दौरा २९ एप्रिल ते १५ सप्टेंबरपर्यंत चालला. एम जे गोपालन यांनी त्याआधी जानेवारी १९३४ मध्ये ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आता १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यातही ते संघात होते.
तर याच वर्षी म्हणजे १९३६ साली बर्लिन येथे क्रीडा जगतातील सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिकचेही आयोजन करण्यात आले होते. तेव्हा भारत हॉकीमध्ये नंबर वन संघ होता आणि गोपालन हॉकीमध्येही भारताकडून खेळले होते.
ऑलिम्पिक खेळ १ ते १६ ऑगस्ट दरम्यान होते. अशा स्थितीत गोपालन यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. गोपालन एक तर इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळू शकणार होते किंवा ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकत होते. अशा स्थितीत गोपालन यांनी क्रिकेटची निवड केली. गोपालन हे उजव्या हाताचे फलंदाज आणि वेगवान गोलंदाज होते.
पण दुखद बाब म्हणजे, त्या इंग्लंड दौऱ्यावर गोपालन यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आणि क्रिकेट संघही २-० ने पराभूत होऊन मायदेशी परतला.
तर दुसरीकडे बर्लिनला गेलेल्या हॉकी संघाने ध्यानचंद यांच्या नेतृत्वात अंतिम फेरीत जर्मनीचा ८-१ असा पराभव करत ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच, यानंतर गोपालन यांना भारताकडून एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
गोपालन हे फील्ड हॉकीमध्ये अत्यंत प्रतिभावान सेंटर-फॉरवर्डचे खेळाडू होते. त्या काळात अनेक इंग्लिश क्रिकेटपटू भारतातील देशांतर्गत सामने खेळत असत आणि सर्वांनी गोपालन यांचे कौतुक केले होते. गोपालन यांच्या नावावर एक खास विक्रम आहे. तो म्हणजे, जेव्हा १९३४ साली रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली, तेव्हा गोपालन यांनीच या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकला होता.
७८ प्रथम श्रेणी सामने, एका शतकासह २९१६ धावा आणि १९४ विकेट
गोपालन सकाळी नेटमध्ये क्रिकेट सराव करायचे आणि संध्याकाळी हॉकीच्या मैदानावर सराव करायचे. तसेच भारतीय हॉकी संघासोबत सिलोन (श्रीलंका), ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले आणि या दौऱ्यातील ४८ पैकी ३९ सामन्यांमध्ये गोल केले.
संबंधित बातम्या