टी-20 वर्ल्डकप २०२४ पासून आयसीसीने एक नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या निमयामुळे कर्णधारांचे टेन्शन काही प्रमाणात वाढणार आहे. स्टॉप क्लॉक रूल असे या नव्या नियमाचे नाव असून खेळाचा वेग वाढवण्यासाठी आयसीसीने हा नियम आणला आहे.
ICC ने आपल्या वार्षिक बोर्ड बैठकीत आगामी टी-20 वर्ल्ड कपपासून स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. आयसीसीचा हा नवा नियम जून २०२४ पासून वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये लागू होणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये या नियमाची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीच्या आधारावर हा नियम वापरण्यात येणार आहे.
ICC ने टी -20 वर्ल्डकपासून (T20 World Cup 2024) स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सध्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये लागू असेल. स्टॉप क्लॉक नियमानुसार, एक षटक संपल्यानंतर, दुसरे षटक सुरू होण्यापूर्वी स्टॉप क्लॉक वापरला जाईल. कर्णधार आणि गोलंदाजाला दुसरे षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदाचा वेळ मिळेल.
वास्तविक, प्रत्येक मैदानात स्टॉप क्लॉकची व्यवस्था केली जाईल. स्टॉप क्लॉक एक षटक संपल्यानंतर पुढची ओव्हर सुरू होईपर्यंत चालत राहील. स्टॉप क्लॉक सुरू करण्याची जबाबदारी थर्ड अंपायरची असेल. घड्याळ ६० ते शून्य सेकंदांपर्यंत चालेल. ही वेळ संपण्यापूर्वी गोलंदाजाला पुढचे षटक टाकण्यासाठी तयार व्हावे लागेल.
स्टॉप क्लॉक नियमाचे उल्लंघन करणे प्रत्येक कर्णधाराला महागात पडेल. नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला दोनदा ताकीद दिली जाईल. मात्र, तिसऱ्यांदा चुकीची पुनरावृत्ती झाल्यास संघाला ५ धावांचा दंड आकारला जाईल. वास्तविक, सामना वेळेवर संपवण्यासाठी आयसीसीने हा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या