Highest Test Run Chase At Sydney Cricket Ground : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाचवी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाले असून टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ विकेट गमावल्या आहेत.
अशा स्थितीत सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलियाला किती धावांचे लक्ष्य देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण त्याआधी, सिडनीच्या मैदानावर चौथ्या डावात किती धावांचे लक्ष्य गाठता येणे सोपे जाईल आणि यापूर्वी चेस झालेले सर्वात मोठे लक्ष्य किती धावांचे होते, हे जाणून घेऊया.
सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. जानेवारी २००६ मध्ये सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलिायने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या डावात २८८ धावांचे आव्हान गाठले होते. सिडनीच्या मैदानावर चौथ्या डावात चेस झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या होती.
या यादीत ऑस्ट्रेलियन संघच दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी १८९८ मध्ये, इंग्लंडविरुद्ध चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २७६ धावांचे लक्ष्य गाठले होते.
सिडनी कसोटीचे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने दिवसअखेर ६ बाद १४१ धावा केल्या होत्या. आता रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर आहेत. जडेजाने ८ तर सुंदरने ६ धावा केल्या आहेत.
टीम इंडियाची ही शेवटची फलंदाजी जोडी आहे. यानंतर गोलंदाज फलंदाजीसाठी मैदानात येऊ लागतील.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया १८५ धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर कांगारूंचा संघ पहिल्या डावात १८१ धावांत गारद झाला. या काळात भारताकडून सिराज आणि प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३-३ बळी घेतले. उर्वरित २-२ विकेट कर्णधार बुमराह आणि अष्टपैलू नितीश रेड्डी यांनी घेतल्या.
संबंधित बातम्या