What is Real Age of Vaibhav Suryavanshi : रणजी ट्रॉफी २०२४ चा सीझन सुरू झाला आहे. स्पर्धेतील सामने देशातील विविध मैदानांवर सुरू झाले आहेत. यावेळी बिहार संघासाठी रणजी ट्रॉफी खूप खास असणार आहे. कारण झारखंडच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच बिहारला रणजी ट्रॉफीच्या एलिट गटात प्रवेश मिळाला आहे.
बिहारचा संघ आपला पहिला ग्रुप सामना पाटणा येथील मोइनुल हक स्टेडियमवर मुंबईविरुद्ध खेळत आहे.
या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा वैभव हा चौथा सर्वात तरुण भारतीय खेळाडू असल्याचे बोलले जात आहे.
क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, वैभवने वयाच्या १२ वर्ष आणि २८४ दिवसांत रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, वैभव सूर्यवंशी याचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला. त्याचे सध्याचे वय आज (६ जानेवारी २०२४) १२ वर्षे २८५ दिवस आहे.
पण वैभव सूर्यवंशी यानेच एका मुलाखतीत सांगितले होते, की तो सप्टेंबर २०२३ मध्ये १४ वर्षांचा होणार आहे. यानंतर आता वैभवच्या खऱ्या वयाबाबत चर्चा सुरू झाल्या आहे. सोबतच या मुलाखतीच्या व्हिडीओपेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? असेही चाहत्यांचे म्हणणे आहे.
वैभव सूर्यवंशीने रणजी करंडक पदार्पणापूर्वी काही मोठ्या स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. यामध्ये हेमंत ट्रॉफी, विनू मांकड ट्रॉफी आणि कूचबिहार ट्रॉफीसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. कूचबिहार ट्रॉफीत वैभवने झारखंड विरुद्धच्या सामन्यात १२८ चेंडूत १५१ धावा केल्या होत्या. वैभव हा भारताच्या १९ वर्षांखालील संघाचाही भाग आहे.
दरम्यान,अलिमुद्दीन (१२ वर्षे ७३ दिवस) हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सर्वात युवा भारतीय खेळाडू आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एसके बोस आहेत. बोस यांनी वयाच्या १२ वर्षे ७६ दिवसांचे असताना प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. मोहम्मद रमजान (१२ वर्षे २४७ दिवस) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
संबंधित बातम्या