IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जात आहे. आज (२४ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक नाबाद १२२ धावा केल्या.
जो रूटचे हे भारताविरुद्धचे १० वे कसोटी शतक आहे. या महत्वूर्ण शतकानंतर जो रूटने खास सेलिब्रेशन केले. त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने पिंकी प्रॉमिसचा इशारा केला. हे सेलिब्रेशन करंगळीच्या साह्याने केले जाते. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला कर्णधार बेन स्टोक्सनेही रूटला या सेलिब्रेशनमध्ये साथ दिली.
इंग्लंडचा फलंदाज जो रूटने शुक्रवारीरांची कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले. हा टप्पा गाठल्यानंतर लगेचच रूटने ड्रेसिंग रूमकडे करंगळी दाखवून आनंद साजरा केला.
या दोघांमधील या सेलिब्रेशनची कहाणी २०२२ मध्ये एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या कसोटीशी संबंधित आहे. एजबॅस्टन येथे भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर दोघांनी असा आनंदोत्सव साजरा केला होता. ही सेलिब्रेशन स्टाईल प्रसिद्ध कलाकार एल्विस प्रेस्ली यांच्यापासून प्रेरित असल्याचे रूटने यापूर्वीच उघड केले होते.
इंग्लंडला पहिल्या डावात ३५३ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली, मात्र ३८ धावा केल्यानंतर तो विकेट फेकून निघून गेला. यानंतर रजत पाटीदारने पुन्हा एकदा निराशा केली आणि तो १७ धावा करून तो स्वस्तात बाद झाला. सरफराज खानही आज फ्लॉप ठरला, तो १४ धावांवर बाद झाला.
दुसऱ्या दिवसअखेर भारताने ७ बाद २१९ धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल ३० तर कुलदीप यादव १७ धावांवर नाबाद परतले आहेत. इंग्लंडकडून शोएब बशीरने ४ फलंदाज बाद केले.