आयपीएल २०२५ च्या लिलावात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. बिहारच्या वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. विशेष म्हणजे, वैभव हा अवघ्या १३ वर्षांचा आहे. युवा खेळाडूंना व्यासपीठ देणाऱ्या या फ्रँचायझीने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे.
वैभवला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वैभवची बेस प्राइस ३० लाख होती. त्याच्यासाठी इतर संघांनीही बोली लावली पण शेवटी राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.
बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चेन्नई येथे भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ यांच्यातील कसोटीत त्याने ६२ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या. त्याने अवघ्या ५८ चेंडूत शतक पूर्ण केले.
त्याआधी त्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच वयाच्या १२ व्या वर्षी बिहारसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले, तेव्हाच तो चर्चेत आला होता. तो भारताच्या प्रथम श्रेणी स्पर्धेत सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
वैभवबाबत प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असे काय आहे, की राहुल द्रविडसह सर्वजण त्याच्या मागे पडले होते. हे सर्वांसाठी थोडं आश्चर्यच होते. पण याबाबत वैभवच्या वडिलांनी एक आतली गोष्ट सांगितली आहे.
वैभवच्या वडिलांनी सांगितले की, राजस्थान रॉयल्सने त्याला ट्रायलसाठी नागपूरला बोलावले होते. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी त्याला एक मॅच सिच्युवेशन दिली होती. ज्यामध्ये वैभवने एका षटकात ३ षटकार मारले आणि १८ धावा केल्या. त्याने या ट्रायलमध्ये एकूण ८ षटकार आणि ४ चौकार मारले. सध्या त्याला फक्त क्रिकेट खेळायचे आहे. काही काळापूर्वी वैभवला डोरेमॉन आवडायचे असेही त्याच्या वडिलांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आता तो फक्त आमचा मुलगा नाही तर संपूर्ण बिहारचा मुलगा आहे. त्याने वयाच्या ८ व्या वर्षी सुरुवात केली आणि १६ वर्षाखालील जिल्हा संघात स्थान मिळवले. मी त्याला समस्तीपूरला घेऊन गेलो, तिथे त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळाले. आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी आपण आपली जमीनही विकल्याचे त्यांनी सांगितले.
वैभव सूर्यवंशी सध्या दुबईत असून अंडर-१९ आशिया कपमध्ये खेळत आहे. ३० नोव्हेंबरला आयसीसी अकादमी मैदानावर भारताचा पाकिस्तानसोबत सामना आहे.
विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सने लिलावात वैभवला खरेदी केले तेव्हा भारताचे माजी प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आता पाहायचं आहे की वैभव २०२५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करतो की नाही.