टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (२९ जून) भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन टीम इंडिया ट्रॉफीसह देशात परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता आज म्हणजेच ४ जुलैला सकाळी रोहित शर्माची चॅम्पियन टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.
चॅम्पियन टीम इंडियाला मायदेशात पोहोचण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागली. भारताच्या विश्वचषक वीरांना मायदेशी पोहोचण्यासाठी ५ दिवस आणि नंतर १६ तासांचा विमानप्रवास लागला.
बेरिल चक्रीवादळामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, त्यांचे कुटुंबीय, कोचिंग सपोर्ट स्टाफ, बीसीसीआयचे अधिकारी बार्बाडोसमध्ये अडकले होते. दोन दिवसांच्या शटडाऊननंतर विमानतळ कार्यान्वित होताच खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयला विशेष चार्टर्ड विमानाची व्यवस्था करावी लागली.
बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर २९ जून (शनिवारी) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला. २०११ नंतर भारताची ही पहिलीच विश्वचषक ट्रॉफी होती. बार्बाडोसमधील टीम हॉटेलमध्ये बराच काळ सेलिब्रेशन सुरू होते, परंतु कॅरेबियन बेटांवर आलेल्या चक्रीवादळामुळे भारताची मायदेशी परतण्याची योजना थांबली होती.
४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बीसीसीआयने एअर इंडियाला एसओएस कॉल करून भारतीय क्रिकेटपटूंसाठी चार्टर विमान पाठवण्याची विनंती केली. यानंतर चॅम्पियन्स २४ विश्वचषक AIC24WC हे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान बार्बाडोसहून बुधवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाले आणि १६ तासांच्या अविरत प्रवासानंतर गुरुवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजता दिल्लीत दाखल झाले.
प्रवास खूपच लांबचा होता, पण भारतीय क्रिकेटपटूंची ऊर्जा जास्त होती. बीसीसीआयने एका व्हिडिओमध्ये विमानातील भारतीय खेळाडूंच्या मूडची झलक शेअर केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॅरेबियन बेटांवर अडकलेल्या २० भारतीय क्रीडा पत्रकारांनाही विमानाने मायदेशी आणण्यात आले. या पत्रकारांनी १६ तासांच्या विमान प्रवासात भारतीय क्रिकेटपटूंनी काय केले याची माहिती दिली.
एअर इंडियाच्या विशेष विमानातील विविध वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांनी सांगितले की, बीसीसीआयने विमानात कोणतेही फोटो क्लिक करू नये किंवा व्हिडीओ चित्रित करू नये, अशी विशेष विनंती केली होती.
विश्वचषकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणल्याबद्दल एअर इंडियाच्या वैमानिकाने भारतीय संघाचे आभार मानण्यासाठी खास घोषणा केल्या. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानंतर भारतीय ड्रेसिंग रूमचा भाग राहणार नाहीत, त्यांचा सन्मान करण्यासाठीही विशेष घोषणा करण्यात आली.
भारतीय खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफ बिझनेस क्लासमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पंड्या, फलंदाज सूर्यकुमार यादव, लेग स्पिनर युजवेंद्र चहल, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह अनेकजण पत्रकारांशी गप्पा मारण्यासाठी इकॉनॉमी विभागात आले.
तर जसप्रीत बुमराहने त्याचा मुलगा अंगद याला लांबच्या प्रवासाचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली होती.
शेवटी १६ तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर टीम इंडिया दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळवार दाखल झाली. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर मुंबईत संध्याकाळी ५ वाजत चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रोड शो होणार आहे.
संबंधित बातम्या