Aus vs WI Test Gabba Test Highlights : ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियासमोर कसोटी सामना जिंकण्यासाठी २१६ धावांचे लक्ष्य होते, पण त्यांचा संघ २०७ धावांत सर्वबाद झाला.
हा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामना जिंकला. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजने जवळपास ३१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य होते. पण ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. मात्र, स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली होती. तो संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. पण त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. स्टीव्ह स्मिथ १४६ चेंडूत ९१ धावा करून नाबाद राहिला.
स्मिथशिवाय ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्यापासून ८ धावा दूर राहिला.
वेस्ट इंडिजसाठी शमार जोसेफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमार जोसेफने ७ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत पाठवले. याशिवाय अल्झारी जोसेफला २ विकेट मिळाले. जस्टिन ग्रेव्हजने १ बळी घेतला.
याआधी वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने २८९ धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत कॅरेबियन संघाचा पराभव केला होता, पण ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने रोमहर्षक विजयाची नोंद केली.