जॉर्जटाऊन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी (१७ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा ४० धावांनी पराभव केला. यासह आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १०वी कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने १६० आणि २४६ धावा केल्या, तर वेस्ट इंडिजचा संघ केवळ १४४ आणि २२२ धावाच करू शकला, त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने ऐतिहासिक कामगिरी केली. या कसोटीत त्याने ६ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज बनण्याचा विक्रम केला.
केशव महाराज याने सामन्याच्या शेवटच्या षटकात १ विकेट घेत आपल्या संघाला ४० धावांनी विजय मिळवून दिला आणि 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताबही पटकावला.
केशव महाराजने ह्यू टेफिल्डचा विक्रम मोडला. महाराजने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२ सामन्यांत १७१ बळी घेतले. त्याने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केशव महाराज आता दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज बनला आहे.
'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताब पटकावल्यानंतर केशव महाराज म्हणाला, की "मला कसोटी क्रिकेटचा अभिमान आहे. खेळावर निष्ठा राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. बावुमा मला खेळ समजून घेण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची संधी देतो."
केशव महाराजने या संपूर्ण दौऱ्यात चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात २ बळी घेत वेस्ट इंडिजची फलंदाजी कठीण केली होती. त्याने दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी केली आणि शेवटच्या विकेटसह ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, ज्यामुळे सामन्याचा निकाल निश्चित झाला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिज संघ नवव्या स्थानावर आहे आणि त्यांना स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच विजय मिळाला आहे.