मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shamar Joseph : स्टार्कनं ज्याचा अंगठा तोडला, त्याच शमार जोसेफनं ७ कांगारूंची शिकार केली, पाहा

Shamar Joseph : स्टार्कनं ज्याचा अंगठा तोडला, त्याच शमार जोसेफनं ७ कांगारूंची शिकार केली, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 28, 2024 09:51 PM IST

Shamar Joseph vs Australia : २४ वर्षांच्या शमार जोसेफने सर्वांना खूपच प्रभावित केले आहे. त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. त्याच्यामुळेच वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास रचण्यात यशस्वी ठरला.

Shamar Joseph vs Australia
Shamar Joseph vs Australia (AP)

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाब्बा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने इतिहास रचला. त्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

हा सामना खूपच थरारक झाला. शेवटी वेस्ट इंडिजने अवघ्या ८ धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्याचा आणि मालिकेचा हिरो वेस्ट इंडिजा युवा गोलंदाज शमार जोसेफ ठरला. शमार जोसेफने याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा दुसरा कसोटी सामना होता.

२४ वर्षांच्या शमार जोसेफने सर्वांना खूपच प्रभावित केले आहे. त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. त्याच्यामुळेच वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास रचण्यात यशस्वी ठरला.

शमर जोसेफने ऑस्ट्रेलियाची दैना उडवली

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल (२७ जानेवारी) शमार जोसेफ फलंदाजी करताना गंभीर जखमी झाला होता. मिचेल स्टार्कच्या यॉर्करने त्याच्या पायाचा अंगठा तोडला होता. त्यामुळे तो फलंदाजीदरम्यान रिटायर हर्ट होऊन तंबूत परतला. 

तसेच, त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता येईल की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी (२८ जानेवारी) तो मैदानावर उतरला आणि शेवटचा फलंदाज जोवर बाद होत नाही तोपर्यंत गोलंदाजी केली.

तो जखमी झाला होता. त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता येणार नाही, असे वाटत होते. पण असे झाले नाही. सामन्याच्या चौथ्या दिवशी शमर जोसेफ गोलंदाजीसाठी आला आणि त्याने किती चांगली गोलंदाजी केली.

शमार जोसेफने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फळी उद्ध्वस्त केली. जोसेफने केवळ २१ चेंडूत ३ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले आणि यामुळे वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केले. 

जोसेफने एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या खतरनाक मधल्या फळीला तंबूत पाठवले. त्याने दुसऱ्या डावात एकूण ७ बळी घेतले. शमार जोसेफने कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केले.

पहिल्या डावातही शमार जोसेफने १बळी आपल्या नावावर केला होता. शामरने या कसोटी सामन्यात ८ विकेट घेतल्या. 

सामन्यात काय घडलं?

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली गेली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर आता हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.

या डे-नाईट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने २८९ धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

२१६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने १४१ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडून शमार जोसेफने ६८ धावांत ७ विकेट घेतल्या. शमार जोसेफ प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज ठरला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi