वेस्ट इंडिजमध्ये सध्या MAX60 कॅरिबियन लीग २०२४ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी (२४ ऑगस्ट) न्यूयॉर्क स्ट्रायकर्स आणि ग्रँड केमन जग्वार्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात आऊट झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा फलंदाज कार्लोस ब्रॅथवेटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रागाच्या भरात चक्क हेल्मेटला बॅटने मारून सीमारेषेबाहेर पाठवले.
या सामन्यात थिसारा परेराच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. कार्लोस ब्रॅथवेट फलंदाजीला आला तेव्हा स्ट्रायकर्सने ७४ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. डावाच्या ९व्या षटकात ४ चेंडूत ७ धावा काढून ब्रॅथवेट खेळत होता. त्यावेळी जोशुआ लिटलच्या शॉर्ट बॉलवर त्याने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो बीट झाला आणि चेंडू त्याच्या खांद्याला लागून हवेत गेला आणि यष्टीरक्षकाने त्याचा झेल घेतला.
यानंतर ग्रँड केमन जग्वार्सच्या संघाने अपील केले, अंपायरने बोट वर केले आणि ब्रेथवेटला बाहेर जाण्याचा इशारा केला, तेव्हा कार्लोस ब्रॅथवेटच्या रागाचा पार चढला. ब्रॅथवेटचा राग इतका पराकोटी गेला की तो पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना सीमारेषेजवळ उभे राहून डोक्यावरून हेल्मेट काढले आणि त्याला चेंडूसारखे बॅटने हवेत भिरकावले. हेल्मेट सीमारेषेबाहेर जाऊन पडले. ब्रेथवेटच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्लोस ब्रॅथवेट हा शेवटचा २१०९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला होता, त्यानंतर तो आता बहुतेकवेळा समालोचक म्हणून दिसला आहे.
वेस्ट इंडिजचा हा खेळाडू जगभरातील टी-१० आणि टी-२० फ्रँचायझी लीगमध्ये नियमित पणे खेळत आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून राष्ट्रीय संघात निवडीच्या स्पर्धेतून बाहेर आहे.
कार्लोस ब्रेथवेलटला २०१६ च्या टी-20 विश्वचषकात खरी ओळख मिळाली होती. त्या वर्ल्डकप फायनलमध्ये त्याने बेन स्टोक्सला सलग ४ षटकार मारून वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवले होते. वेस्ट इंडिजला ६ चेंडूत १९ धावांची गरज होती.
दरम्यान, हा सामना जिंकून कार्लोस ब्रॅथवेटचा संघ न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत न्यूयॉर्कचा सामना कॅरेबियन टायगर्सशी झाला. त्या सामन्यात स्ट्रायकर्सला केवळ १२६ धावांचे लक्ष्य गाठायचे होते, परंतु प्रत्युत्तरात संघ ६९ धावांवर गडगडला आणि ५६ धावांनी सामना गमावला.