वेस्ट इंडिजच्या युवा संघाने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियासमोर कसोटी सामना जिंकण्यासाठी २१६ धावांचे लक्ष्य होते, पण त्यांचा संघ २०७ धावांत सर्वबाद झाला.
विशेष म्हणजे, क्रेग ब्रॅथवेटच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजने २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटीत सामना जिंकला आहे. वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन सर्वांनी केले. अशातच या सामन्यात कॉमेंट्री करणारे अॅडम गिलख्रिस्ट आणि ब्रायन लारा यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कॉमेंट्री बॉक्समधला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
वास्तविक, वेस्ट इंडिजला इतिहास रचण्यासाठी केवळ १ विकेटची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड फलंदाजी करत होता. तर दुसऱ्या एंडला स्टीव्ह स्मिथ होता. पण या सामन्याचा हिरो शामर जोसेफने हेजलवूडला क्लीन बोल्ड करून इतिहास रचला. वेस्ट इंडिजने सामना जिंकल्यानंतर खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन दिग्गजांनी एकमेकांना मिठी मारली.
ब्रायन लारा हा वेस्ट इंडिजचा महान खेळाडू आहे तर ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज आहे. पण जेव्हा वेस्ट इंडिजने गाबा कसोटी जिंकली तेव्हा, या दोन्ही खेळाडूंनी तो क्षण साजरा केला.
ऑस्ट्रेलिया पराभूत झाली, याचे दुख गिलख्रिस्टला झाले नाही, असे नाही. पण शेजारी बसलेला त्याचा मित्र ब्रायन लारासाठी आणि त्याच्या देशासाठी हा क्षण खास होता. हाच खास क्षण गिलख्रिस्टने लारासोबत साजरा केला.
शमार जोसेफने हेझलवूडला क्लीन बोल्ड करताच गिलख्रिस्टने लाराला कडकडून मिठी मारली. खिलाडूवृत्ती कशाला म्हणतात ते गिलीने दाखवून दिले. कॅरेबियन संघाच्या विजयानंतर ब्रायन लाराच्या डोळ्यात पाणी आले होते.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली गेली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर आता हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.
या डे-नाईट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने २८९ धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
२१६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने १४१ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडून शमार जोसेफने ६८ धावांत ७ विकेट घेतल्या. शमार जोसेफ प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज ठरला.