Pakistan vs West Indies 2nd Test : पाकिस्तान क्रिकेट संघाची पुन्हा एकदा बदनामी झाली आहे. शान मसूद याचा संघ स्वत:च्याच जाळ्यात अडकला. वास्तविक, पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध फिरकी गोलंदासांठीची पीच तयार केला होती आणि पहिली कसोटी तीन दिवसांत सहज जिंकली होती, पण दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा पराभव केला.
मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने यजमान पाकिस्तानचा १२० धावांनी पराभव केला. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १६३ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात १५३ धावांत गडगडला.
यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात २४४ धावा केल्या आणि यजमान संघासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १३३ धावांवर गारद झाला.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसाठी केवळ तीन गोलंदाजांनी गोलंदाजी केली. जोमेल वॅरिकन याने २७ धावांत ५ बळी घेतले. केविन सिंक्लेअरला ३ विकेट मिळाले. गुडाकेश मोतीनेही २ गडी बाद केले.
वेस्ट इंडिजच्या फिरकी त्रिकुटाविरुद्ध कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला यश मिळाले नाही. दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूद ०२ धावा आणि मोहम्मद हुरैरा ०२ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीर अवघ्या ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर बाबर आझमने जबाबदारी स्वीकारली, मात्र दरम्यान कामरान गुलाम १९ धावा करून बाद झाला. बाबरने ६७ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या.
यानंतर सौद शकील १३, काशिफ अली १, मोहम्मद रिझवान २५ आणि सलमान अली आगा १५ धावा करून बाद झाला. यानंतर साजिद खान ७ धावा करून बाद झाला तर नोमान अली ६ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे संपूर्ण संघ १३३ धावांवर गडगडला.
तत्पूर्वी, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने ५२ धावा, आमिर जांगूने ३० धावा, टेविन इम्लाकने ३५ धावा आणि केविन सिंक्लेअरने २८ धावा केल्या. पाकिस्तानकडून साजिद खान आणि नोमान अली यांनी ४-४ विकेट घेतल्या. अबरार अहमद आणि काशिफ अली यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
पहिल्या डावाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४९ धावा केल्या. याशिवाय शान मसूद १५, बाबर आझम १, कामरान गुलाम १६, सौद शकील ३२ आणि सलमान आगा ९ धावा करून बाद झाले. वेस्ट इंडिजकडून जोमेल वारिकनने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या