India Vs West Indies 5th T20I Scorecard : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेतील विजयाने केली. यानंतर वनडे मालिकाही जिंकली. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-२० मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागल्याने मालिका संपुष्टात आली.
या मालिकेतील पहिले २ सामने यजमान विंडीजने जिंकले होते. यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत पुढचे दोन सामने जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. पण पाचव्या सामन्यात त्यांना ८ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारतीय संघाने ही मालिका २-३ ने गमावली.
या संपूर्ण मालिकेत हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर जोरदार टीका होत आहे. गेल्या सामन्यातही पांड्याची खराब कॅप्टन्सी दिसून आली. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. संघाने केवळ १७ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल (५) आणि शुभमन गिल (९) लवकर बाद झाले.
यानंतर सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत ६१ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला सांभाळले. यामुळे भारतीय संघाने ९ बाद १६५ धावा केल्या. विंडीजकडून रोमॅरियो शेफर्डने ४, तर जेसन होल्डर आणि अकील हुसेनने २-२ विकेट घेतल्या.
हार्दिक पांड्यानेही फलंदाजी अतिशय संथ केली. त्याने १८ चेंडू खेळले, ज्यावर केवळ १४ धावा झाल्या. टी-20 फॉरमॅटमध्ये ही अतिशय संथ खेळी आहे. त्यावर जोरदार टीकाही झाली. यानंतर पांड्याने गोलंदाजीतही पहिले षटक केले. त्यात भरपूर धावा दिल्या.
गेल्या सामन्यातही पांड्याने कॅप्टन्सीत चुका केल्या होत्या. त्याने अक्षरला पहिल्या १३ षटकात गोलंदाजी दिली नाही. तर मुकेश कुमारलाही एकच षटक दिले. त्याला कुलदीप आणि चहलचाही योग्य वापर करता आला नाही. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने पहिले षटक फिरकी गोलंदाज अकिल हुसेनला दिले. त्याने यशस्वी आणि गिलला लवकर बाद केले.
या पराभवासह भारतीय संघाचा एक ऐतिहासिक विक्रमही मोडला गेला. हा विक्रम ५ सामन्यांच्या द्विपक्षीय T20 मालिकेत अजिंक्य राहण्याचा आहे. वास्तविक, भारतीय संघाने आपल्या क्रिकेट इतिहासात प्रथमच ५ सामन्यांची द्विपक्षीय T20 मालिका गमावली आहे. टीम इंडियाची पाच सामन्यांची ही पाचवी द्विपक्षीय मालिका होती.
यापूर्वी टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका खेळली होती. यादरम्यान भारतीय संघाने ४ पैकी ३ मालिका जिंकल्या आहेत, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत होती.
सामन्यात १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने २ गडी गमावून सामना जिंकण्यासाठी १७१ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाकडून ब्रेंडन किंगने ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा केल्या. तर निकोलस पूरनने ४७ धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजीत कोणीही कमाल दाखवू शकले नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू तिलक वर्मा यांना १-१ विकेट मिळाली. त्याच्याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
वेस्ट इंडिजबद्दल बोलायचे झाले तर ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९ द्विपक्षीय टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी भारतीय संघाने ६ मालिका जिंकल्या आहेत, तर ३ मालिका गमावल्या आहेत. वेस्ट इंडिजने २०१६ आणि २०१७ मध्ये भारताविरुद्ध सलग २ मालिका जिंकल्या. तेव्हापासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ५ टी-20 मालिकेत सतत पराभव केला. आता सहाव्या मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.
संबंधित बातम्या