यंदा टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. त्यामुळे सर्वच संघ आता जास्तीत टी-20 सामने खेळत आहेत. पुरुषांचा टी-20 वर्ल्डकप जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे. तर महिलांचा टी-20 वर्ल्डकप बांगलादेशात खेळला जाणार आहे.
आयसीसीने पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे. परंतु महिलांच्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. महिलांचा टी-20 विश्वचषक या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवला जाईल.
दरम्यान, वेस्ट इंडिजच्या ४ वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंनी अचानक निवृत्ती जाहीर करून आपल्या संघाला आणि क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजने २०१६ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हा त्या संघात हे चारही खेळाडू होते.
वेस्ट इंडिजच्या ४ महिला खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूंमध्ये अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमन, किसिया आणि किशोना नाइट यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या महिला खेळाडू २०१६ च्या वर्ल्डकप विजेत्या संघात होत्या.
ऑफ-स्पिनर अनीसा मोहम्मदने २००३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता २१ वर्षांनंतर ती एकदिवसीय आणि T20 मध्ये वेस्ट इंडिजची सर्वोत्तम फिरकी गोलंदाज बनून निवृत्त झाली आहे.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारी ती कॅरिबियन बेटांची पहिली पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू आहे. हॅट्ट्रिक घेणारी ती वेस्ट इंडिजची पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
अनीसा मोहम्मदने आपल्या कारकिर्दीत १४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८० विकेट घेतल्या आहेत. तर ११७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२५ बळी घेतले आहेत. अनीसा मोहम्मदने वेस्ट इंडिजसाठी एकूण १२ वर्ल्डकप खेळले. यात ५ वनडे तर ७ टी-20 वर्ल्डकपचा समावेश आहे.
निवृत्तीबाबत अनीसा मोहम्मद म्हणाली की, गेली २० वर्षे खरोखरच आश्चर्यकारक होती, मी यातील प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे. मला वाटते की आता मी खेळापासून दूर जाण्याची आणि युवा खेळाडूंना त्यांची स्वप्ने जगू देण्याची वेळ आली आहे. माझ्या कारकिर्दीत मला २५८ वेळा मरून रंग परिधान करून मैदानात उतरण्याचा बहुमान मिळाला आहे'.
मध्यमगती गोलंदाज शकीरा सेलमनने २००८ मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने १०० एकदिवसीय आणि ९६ टी-20 सामने खेळले आहेत. यात तिने ८२ आणि ५१ बळी घेतले.
दुसरीकडे, किसिया आणि किशोना नाइट या जुळ्या बहिणी पुढील महिन्यात ३२ वर्षांच्या होणार आहेत. दोन्ही खेळाडूंनी कमी वयात निवृत्ती जाहीर केली आहे. किसियाने २०११ मध्ये आणि किशोना नाइट २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि वेस्ट इंडिजकडून अनेक सामने खेळले.
विकेटकीपर फलंदाज किसिया नाइटने ८७ एकदिवसीय आणि ७० टी-20 सामने खेळले आहेत, तर तिची जुळी बहिण किशोनाने ५१ एकदिवसीय आणि ५५ टी-20 सामने खेळले. या ४ खेळाडूंच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.