विराट कोहली हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. विराटचे इन्स्टाग्रामवर २६६ मिलियन्स फॉलोवर्स आहेत. पोर्तुगालचा महान स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी यांच्यानंतर तो सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे.
सर्च इंजिन गुगलच्या संपूर्ण २५ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट नंबर वन आहे. या यादीत महान सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा या खेळाडूंचाही समावेश आहे.
पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो नाझारियो दिसत आहे. या व्हिडीओत रोनाल्डोने आपण विराटला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
वास्तविक, यु ट्युबर स्पीड याने रोनाल्डोला काही प्रश्न विचारले. या संभाषणात त्याने विराट कोहलीबद्दलही विचारले. विराटच्या प्रश्नावर रोनाल्डो म्हणाला की, तो कोण आहे? हे मला माहीत नाही. यानंतर स्पीडने विराटबाबत त्याला माहिती दिली.
स्पीडचा प्रश्न- तू विराट कोहलीला ओळखतोस का?
रोनाल्डो- कोण विराट कोहली?
स्पीड- विराट कोहली, भारतीय आहे.
रोनाल्डो - नाही….
स्पीड- तू विराट कोहलीला ओळखत नाहीस!
रोनाल्डो- ते काय आहे? एक खेळाडू?
स्पीड - तो क्रिकेटपटू आहे.
रोनाल्डो- तो येथे फारसा लोकप्रिय नाही.
स्पीड- आश्चर्यचकित होऊन स्पीडने त्याच्या फोनवर विराट कोहलीचा फोटो रोनाल्डोला दाखवला आणि म्हणाला तो सर्वोत्कृष्ट आहे. तो बाबर आझमपेक्षाही चांगला आहे. तु याला कधी पाहिलं नाही का?
रोनाल्डो- अच्छा
विशेष म्हणजे, अशाच पद्धतीने रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हाला एकदा महान सचिन तेंडुलकरबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी शारापोव्हानेही सचिनला ओळखत नसल्याचे सांगितले होते. यानंतर शारापोव्हाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. तथापि, येथे एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे की रशिया आणि ब्राझील हे दोन्ही देश असे आहेत जेथे क्रिकेट हा खेळ फारसा लोकप्रिय नाही.