Nitish Kumar Reddy Father : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. मेलबर्नमध्ये सामन्याच्या चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. भारताचा शतकवीर नितीश कुमार रेड्डी याचे वडील मुत्यालू रेड्डी यांनी महान फलंदाज सुनील गावस्कर यांची भेट घेतली. यावेळी ते गावसकरांच्या पाया पडले.
रेड्डी कुटुंबीय आणि गावस्कर यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावस्कर यांनी भावूकपणे नितीशच्या वडिलांना मिठी मारली. यावेळी नितीशची आई आणि बहीणही तेथे उपस्थित होते.
नितीश कुमार रेड्डी याच्या शतकी खेळीनंतर सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री हे रेड्डी कुटुंबियांना भेटले. यावेळी गावस्कर म्हणाले की, नितीश यांच्या वडिलांचा संघर्ष मला माहीत आहे.
कसोटीत सर्वात प्रथम १० हजार धावा करणारे सुनील गावस्कर म्हणाले, की ‘त्यांनी किती त्याग केला आहे हे आम्हाला माहीत आहे. तुमच्यामुळे मीही भावूक झालो आहे. तुमच्यामुळे भारताला नवा हिरा मिळाला आहे’.
शनिवारी मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीशने शानदार शतक झळकावले. त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. मेलबर्न कसोटी सामना पाहण्यासाठी रेड्डी कुटुंब ऑस्ट्रेलियात आले आहे. नितीशने त्यांना निराश केले नाही आणि या दौऱ्यातील आपली सर्वोत्तम खेळी खेळली. त्याचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाने भारताला सामन्यात परत आणले.
चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) भारताने आपला डाव ३५८/९ धावांवरून पुढे वाढवला. संघाने स्कोअरबोर्डमध्ये केवळ ११ धावांची भर घातली आणि ३६९ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेतली होती.
नॅथन लायनने नितीश रेड्डीला मिचेल स्टार्ककडे झेलबाद करून भारतीय संघाचा डाव गुंडाळला. नितीशने १८९ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११४ धावा केल्या. नितीशच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.
संबंधित बातम्या