इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना आजपासून (१० जुलै) लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडच्या संघाला पहिल्या १० षटकात एकही विकेट घेता आली नाही पण त्यानंतर एकापाठोपाठ ३ विकेट पडल्या.
हॅरी ब्रूकच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला दुसरी विकेट मिळाली. कर्णधार बेन स्टोक्सच्या चेंडूवर मायकेल लुईसची विकेट पडली. ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू लुईसच्या बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. हॅरी ब्रूकने तिसऱ्या स्लिपमध्ये उभा होता. त्याने उजवीकडे झेप घेत अप्रितम झेल घेतला. चेंडू मैदानाला स्पर्श करणार तेवढ्यात त्याने तो अलगद पकडला. हा झेल त्याने एका हाताने घेतला. यानंतर कॅप्टन बेन स्टोक्सने धावत जाऊन ब्रुकला मिठी मारली.
उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. वेस्ट इंडिजला पहिला झटका कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या रूपाने ३४ धावांवर बसला. यानंतर २ धावांनी कर्क मॅकेन्झीही पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोन्ही फलंदाज गस ऍटकिन्सनने बाद केले.
वेस्ट इंडिजला ८ धावांनंतर तिसरा धक्का बसला. लुईस २७ धावा करून बेन स्टोक्सच्या चेंडूवर बाद झाला. उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजची धावसंख्या ३ विकेटवर ६१ धावा होती.
इंग्लंडकडून शेवटची कसोटी खेळणाऱ्या जेम्स अँडरसनला अद्याप विकेट मिळालेली नाही. त्याने आतापर्यंत सर्वाधिक ९ षटके टाकली आहेत. या काळात त्याने २० धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. २००३ मध्ये अँडरसनने या मैदानावर कसोटी पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीतील ही १८८ वी कसोटी आहे. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक कसोटी खेळणारा तो खेळाडू आहे.
संबंधित बातम्या