super smash t20 best catch video : क्रिकेटमध्ये अविश्वसनीय आणि थरारक झेल घेण्याच्या घटना दररोज पहायला मिळतात. पण न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश टी-20 या स्पर्धेत दोन खेळाडूंनी एक जबरदस्त झेल घेतला आहे. यानंतर आता हा झेल क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे बोलले जात आहे.
हा झेल न्यूझीलंडची क्रिकेट लीग सुपर स्मॅश टी-20 स्पर्धेच्या एका सामन्यातील आहे. या स्पर्धेत शनिवारी (१३ जानेवारी) वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स यांच्यातील एक सामना बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला गेला. याच सामन्यात ट्रॉय जॉन्सन आणि निक केली यांनी अप्रतिम झेल घेतला.
सामन्यात वेलिंगस्टन फायरबर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ८ बाद १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सेंट्रल स्टॅगने ४ गडी गमावून १४८ धावा करत सामना सहज जिंकला.
दरम्यान , या धावांचा पाठलाग करताना सेंट्रल स्टॅग्सचा फलंदाज विल यंगने स्ट्रेटच्या दिशेने हवेत फटका खेळला. चेंडू उंच हवेत गेला आणि सीमारेषेच्या दिशेने प्रवास करू लागला. तर मिड ऑनवर उभा असलेला फिल्डर ट्रॉय जॉन्सन चेंडूच्या खालून सीमारेषेच्या धावत होता.
चेंडू आणि ट्रॉय दोघेही सीमारेषेपर्यंत पोहोचले. आता चेंडू मैदानावर पडणार तेवढ्यात ट्रॉयने डाइव्ह मारत चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला पण डाईव्ह मारल्यानंतर ट्रॉय घसरत सीमारेषेच्या बाहेर जाऊ लागला. यानंतर त्याने कसा तरी चेंडू पुन्हा हवेत फेकला. यानंतर त्याच्या मागून धावत येत असलेल्या निक केलीने हा चेंडू अलगद पकडला आणि एक अविश्वसनीय झेल पूर्ण झाला.
क्रिकेट चाहत्यांच्या मते हा आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल आहे. या अप्रतिम झेलचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या