रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने गेल्या शनिवारी (१८ मे) चेन्नई सुपर किंग्ज संघावर विजय मिळवत आयपीएल २०२४ च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. या करा किंवा मरो सामन्यात बंगळुरूने प्रथम खेळून २१८ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. मात्र, बेंगळुरूच्या गोलंदाजांनी पाचवेळच्या चॅम्पियनला १९१ धावांत रोखले.
आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले.
दरम्यान, या विजयानंतर आरसीबीचे चाहते आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर त्यांनी जल्लोष साजरा केला. पण सोशल मीडियावर काही व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले. या व्हिडीओत आरसीबीच्या चाहत्यांनी सेलिब्रेशन करताना सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले.
वास्तविक, आरसीबीच्या चाहत्यांनी सामना संपल्यानंतर पराभूत झालेल्या सीएसकेच्या चाहत्यांना प्रचंड त्रास दिला. एका व्हिडीओत पिवळी जर्सी घातलेला सीएसकेचा चाहता दिसत आहे. तर त्याच्या बाजूने सर्व आरसीबीचे चाहते त्याला त्रास देत असल्याचे दिसत आहे. यावेळी काही जणांनी त्याला अनेकदा उचलून हवेत उडवल्याचेही दिसत आहे.
आरसीबीच्या चाहत्यांच्या गर्दीत फक्त एकच व्यक्ती अडकलेला दिसत होता. आरसीबीचे चाहते त्याच्या चेहऱ्यावर थट्टा करत होते त्याची खिल्ली उडवत होते.
यावेळी सीएसकेचे चाहते इतके घाबरले की त्यांना एक शब्दही बोलता आला नाही आणि यादरम्यान त्यांना रडू कोसळले. तथापि, असे असूनही, आरसीबीच्या चाहत्यांनी त्यांचे लाजिरवाणे कृत्य थांबवले नाही उलट त्यांनी आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, काही चाहत्यांनी एक्सवर आपली व्यथा सांगितली आहे. अॅनी स्टीव्ह नावाच्या एका युजरने लिहिले की, "चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आणि आजूबाजूला सीएसकेची जर्सी परिधान केल्याने असुरक्षित वाटत आहे. येथील आरसीबीचे चाहते (पुरुष) तिथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिवीगाळ आणि धमकावत आहेत. इथले बरेच पुरुष इतके मद्यधुंद असतात आणि चेहऱ्यावर शिवीगाळ करतात मग ते स्त्रिया असोत किंवा पुरुष. लोक आम्हाला घाबरवून बेदरकारपणे गाडी चालवत आहेत.
आणखी एका युजरने दावा केला की, सीएसकेच्या चाहत्यांना त्यांची जर्सी रस्त्यावर उतरवण्यास सांगण्यात आले होते.
सीएसकेच्या रंगात जो कोणी स्टेडियममधून बाहेर पडत आहे, त्याला आरसीबीचे स्थानिक समर्थक ट्रोल करत आहेत आम्ही दोन मुली होतो आणि नुकतेच कॅबने घरी पोहचलो. पाच वेळा चॅम्पियन असलेली ही पिवळी जर्सी नेहमी अभिमानाने परिधान केली.
दरम्यान, सीएसकेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचण्यास सांगितले. सीएसकेच्या अधिकृत एक्स हँडलवरून एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमच्या चाहत्यांना ज्यांनी आज बंगळुरूमध्ये येऊन आम्हाला पाठिंबा दिला, मला आशा आहे की तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात. तुमच्या प्रेमआणि पाठिंब्याबद्दल मी सदैव आभारी आहे.
संबंधित बातम्या