PBKS vs CSK IPL 2025 : पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्य याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार शतक (१०३) झळकावले. संघ मालक प्रीती झिंटा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीज्याप्रकारे प्रियांशचे हे शतक साजरे केले, त्यावरून ही खेळी किती महत्त्वाची होती हे दिसून आले.
सामन्यानंतर, प्रीती झिंटाने प्रियांश आर्यची भेट घेतली आणि या शानदार खेळीबद्दल त्याचे अभिनंदन केले.
वास्तविक, आयपीएल २०२५ चा २२वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. मुल्लानपूरच्या स्टेडियमवर पंजाब किंग्जने ८३ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, पण दुसऱ्या टोकाला प्रियांश आर्यने त्याची स्फोटक खेळी सुरू ठेवली. त्याने ४२ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांसह १०३ धावांची खेळी केली.
पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. सतत विकेट पडत असल्याचे पाहून संघ मालक प्रीती झिंटा निराश झाली होती. पण प्रियांशने तिला आनंदाने नाचण्याची संधी दिली. प्रीती आणि प्रियांशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सामन्यानंतरचा आहे.
सिमरन सिंग (०), श्रेयस अय्यर (९), मार्कस स्टोइनिस (४), नेहल वधेरा (९) आणि ग्लेन मॅक्सवेल (१) यांच्या रूपात आघाडीच्या पाच विकेट ८३ धावांत पडल्यानंतर संघावर दबाव होता, पण प्रियांश आर्यने एक अद्भुत शतक झळकावले. शशांक सिंग (२९) आणि मार्को जानसेन (३४) यांनीही महत्त्वपूर्ण धावा केल्या.
प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्ज फक्त २०१ धावा करू शकले आणि १८ धावांनी सामना गमावला. पंजाब किंग्जला त्यांच्या ७ गोलंदाजांचा वापर करावा लागला, ज्यामध्ये लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ४० धावा देत २ बळी घेतले. या शानदार खेळीसाठी प्रियांश आर्यला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
सामन्यानंतर प्रियांश आर्य म्हणाला की, सतत विकेट पडल्यानंतर त्याला एकेरी आणि दुहेरीसह खेळ पुढे नेण्याची इच्छा होती. पण नेहल वधेराने त्याला त्याच्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला दिला. पंजाब किंग्जचा हा ४ सामन्यांतील तिसरा विजय आहे, संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या