Major League Cricket 2024: अमेरिका मेजर क्रिकेट लीग २०२४ च्या १९ व्या सामन्यात एमआय न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्स एकमेकांशी भिडले. या सामन्यात एमआयचा कर्णधार कायरन पोलार्डने मारलेल्या षटकारामुळे स्टेडियममध्ये बसलेली चाहती जखमी झाली. यानंतर पोलार्डने तरुणीजवळ जाऊन माफी मागितली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
एमआयच्या डावातील १५ व्या षटकात नाइट रायडर्सकडून स्पेंसर जॉनसन गोलंदाजी करत होता. याच षटकात कायरन पोलार्डने मारलेला षटकार स्टेडियममध्ये बसलेल्या तरुणीच्या हाताला लागला. ही तरुणी एमआयची चाहती असल्याचे समजत आहे. कारण तिने एमआयची जर्सी घातलेली दिसत आहे. सामना संपल्यानंतर कायरन पोलार्डने तरुणीकडे जाऊन तिचे विचारपूस केली. त्यानंतर तिची माफी मागून आपला ऑटोग्राफ दिला. या सामन्यात कायरन पोलार्डने अवघ्या १२ चेंडूत ३३ धावा केल्या. ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.
या समन्यात एमआय न्यूयॉर्कने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या नाइट रायडर्सचा १९.१ षटकात १३० धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एमआयच्या संघाने अवघ्या १७ षटकात ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह एमआय न्यूयॉर्क प्लेऑफसाठी क्वालीफाय झाली आहे. आता पोलार्डचा संघ एलिमिनेटर सामन्यात टेक्सास सुपर किंग्जशी भिडणार आहे. या दोघांमधील सामना २४ जुलै रोजी डलास येथे खेळला जाईल.