क्रिकेटपटूंचा एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम सुरूच आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंध्र प्रदेशचा फलंदाज वामसी कृष्णाने सीके नायडू ट्रॉफीमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारले होते.
आता केरळच्या अभिजीत प्रवीणने एका षटकात सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम येथे नॅव्हिओ युथ ट्रॉफी अंडर-२२ स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेत अभिजीत प्रविणने मास्टर्स क्लबसाठी ही कामगिरी केली. त्याने ट्रायडंट क्रिकेट अकादमीच्या जो फ्रान्सिसच्या एकाच षटकात ६ षटकार ठोकले.
३० षटकांच्या सामन्यात अभिजीतने २१व्या षटकात हा पराक्रम केला. त्यावेळी तो आपले अर्धशतक पूर्ण करून ६९ धावांवर खेळत होता. पण यानंतरच्या जो फ्रान्सिस गोलंदाजीला आला. जो फ्रान्सिसच्या पहिल्याच चेंडूवर अभिजीने लॉंग ऑफवर षटकार ठोकला. दुसरा षटकार देखील याच दिशेला गेला. यानंतर तिसरा षटकार डीप मिडविकेटच्या दिशेने आणि चौथा षटकार अभिजीत प्रविणने लेग साईडच्या दिशेने मारला. तर यानंतरचे दोन षटकार त्याने लाँग ऑनवर षटकार खेचले.
अशा प्रकारे अभिजीत प्रविणने सहा चेंडूत ६ षटकार पूर्ण केले आणि सोबतच शतकही पूर्ण केले.
मात्र यानंतरच्या षटकात षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने ५२ चेंडूत १० षटकार आणि २ चौकारांसह १०६ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर अभिजीतच्या संघाने १०६ धावांनी विजय मिळवला.
अभिजीत हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्यम गतीने गोलंदाजी करतो आणि उपयुक्त फलंदाज आहे. तो हार्दिक पांड्या आणि एबी डिव्हिलियर्सला आपला आदर्श मानतो. अभिजीतने डिसेंबर २०२३ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली केरळसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध सामना खेळला आणि तीन विकेट्स घेतल्या. मात्र, त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.
संबंधित बातम्या