भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे नाईट कसोटी आजपासून सुरू झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने भारतीय फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. स्टार्कने ५ विकेट घेत टीम इंडियाचा पहिला डाव १८० धावांवर गारद केला.
टीम इंडियाकडून केवळ नितीश रेड्डी याने फलंदाजी कमाल केली. इतर सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजंनी दिवसाच्या पहिल्या सत्रात ८२ धावांत ४ फलंदाज बाद केले. तर दुसऱ्या सत्रात ९८ धावांत ६ फलंदाजांना तंबूत पाठवत टीम इंडियाला ऑलआऊट केले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४८ धावात ६ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्सने २ तर स्कॉट बोलँड (५४ धावांत २ विकेट) यांनी दुसऱ्या सत्रात गुलाबी चेंडूने भारतीय फलंदाजांना अधिक त्रास दिला.
पर्थ कसोटी पदार्पणातच छाप पाडणाऱ्यानितीश रेड्डीने ५४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या डावात ३ षटकार आणि ३ चौकार मारले. रेड्डीने आक्रमक वृत्ती दाखवली. त्याने यावेळी स्कॉट बोलँड याला रिव्हर्स स्कूपवर षटकार ठोकला.
एकवेळ भारत एका विकेटवर ६९ धावा अशा चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत होते पण स्टार्कने सलामीवीर राहुल (६४ चेंडूत ३७ धावा) आणि विराट कोहली (८ चेंडूत ७ धावा) यांना झटपट बाद करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले. तत्पूर्वी, राहुल आणि शुभमन गिल (५१ चेंडूत ३१ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने १ गडी गमावून ८६ धावा केल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा ९४ धावांनी मागे आहे. मॅकस्विनी आणि लॅबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. लॅबुशेन नाबाद २० आणि मॅकस्वीनी ३८ धावांवर नाबाद परतले आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने एकमेव विकेट घेतली.