Trending News: लहान मुलामध्ये दिसली जसप्रीत बुमराहची झलक; पाहून वसीम अक्रमही झाला चकीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Trending News: लहान मुलामध्ये दिसली जसप्रीत बुमराहची झलक; पाहून वसीम अक्रमही झाला चकीत

Trending News: लहान मुलामध्ये दिसली जसप्रीत बुमराहची झलक; पाहून वसीम अक्रमही झाला चकीत

Jul 16, 2024 01:03 PM IST

Wasim Akram: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने शेअर केलेला लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वसीम अक्रमने शेअर केला पाकिस्तानमधील ज्युनिअर जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ
वसीम अक्रमने शेअर केला पाकिस्तानमधील ज्युनिअर जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ

Viral Video: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. भारताने गेल्या महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकले आणि जसप्रीत बुमराह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हा मुलगा जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनची हुबेहुब कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्विंगचा सुलतान म्हटला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम देखील चकीत झाला आहे.

या मुलाचा व्हिडिओ शेअर करताना वसीम अक्रमने लिहिले की, 'वाह, वाह... या मुलाची गोलंदाजी आणि नियंत्रण बघा...जसप्रीत बुमराहप्रमाणेच! माझ्यासाठी हा व्हिडिओ ऑफ द डे आहे. क्रिकेटला सीमा नसते.

वसीम अक्रमने अनेकवेळा उघडपणे बुमराहचे कौतुक केले आहे. बुमराह या पिढीतील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज असल्याचे त्याने कित्येकदा बोलले आहे. भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर बुमराह आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत दिसला होता. भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, जिथे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाला भारताने पाच सामन्यांची मालिका ४-१ जिंकली. बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

 

२०२४ च्या टी-२० विश्वचषकात बुमराहची दमदार गोलंदाजी

२०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला चॅम्पियन बनवण्यात बुमराहचे मोठे योगदान होते. या स्पर्धेत बुमराह भारतीय संघ अडचणीत असताना महत्त्वाच्या विकेट घेतल्या. बुमराहने स्पर्धेतील ८ सामन्यात ८.२७ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळेच त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब देण्यात आला. विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात बुमराहचे भरभरून कौतुक केले होते.

श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये कोणतीही मालिका खेळणार नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात सप्टेंबरमध्ये २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका भारतात होणार आहेत. भारताला या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौराही करायचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

Whats_app_banner