पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज आणि स्विंगचा सुलतान म्हणून ओळखला जाणारा वसीम अक्रम सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतानाही दिसतो. पण एखादी कमेंट किंवा प्रश्न आवडला नाही तर तो कठोर शब्दात प्रत्युत्तरही देतो.
अशातच आता, वसीम अक्रम आणि एका युझरमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. वास्तविक, वसीम अक्रमने त्याची ऑस्ट्रेलियन पत्नी शनायरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टवर एका चाहत्याने एक कमेंट केली, पण ही कमेंट अक्रमला आवडली नाही आणि त्याने कमेंट करणाऱ्या चाहत्याला चांगलेच फटकारले आहे.
वसीम अक्रमने काही दिवसांपूर्वी पत्नीसोबतचा एक फोटो अपलोड केला होता. अक्रमने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘एका चांगल्या वर्षाची अपेक्षा आहे’. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला २०२४ हे वर्ष प्रेम, सुरक्षितता आणि भरभराटीचे जावो, माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा'.
मात्र, या फोटोवर एका चाहत्याने उद्धटपणे कमेंट केली. त्याने लिहिले की, उफ्फ्फ खूपच हॉट वाइफ आहे'.
ही कमेंट पाहिल्यानंतर त्या युजरला फटकारण्यास अक्रमने जराही वेळ लावला नाही. अक्रमने कमेंट करणाऱ्याला प्रत्युत्तर देत लिहिले की, ‘तुला असं म्हणणं योग्य वाटतं का? मला तुझ्या आई-वडिलांना भेटायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे, की तुम्ही हे काय जन्माला घातलंय?’.
वसीम अक्रम हा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो कधीही ट्रोलर्सना धडा शिकवण्यास मागेपुढे पाहत नाही. विशेष म्हणजे, वसीमचे हे दुसरे लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
वसीम अक्रम नुकताच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कॉमेंट्री करताना दिसला होता. वसीम हा पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो चांगले इंग्रजी बोलतो आणि वर्षभर क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये व्यस्त असतो.
संबंधित बातम्या