भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ८ विकेट्सनी पराभव झाला. यानंतर आता टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीसाठी अचानक मोठा बदल केला आहे. स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचा दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
बंगळुरू कसोटीतील पराभवाच्या काही तासांनंतरच सुंदरचा टीम इंडियामध्ये समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी सायंकाळी ही घोषणा केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुणे येथे २४ ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे.
वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी मार्च २०२१ मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. आतापर्यंत त्याने भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना त्याने ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. सुंदरचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ९६* धावा आहे. याशिवाय ७ डावात गोलंदाजी करताना ४९.८३ च्या सरासरीने ६ बळी घेतले आहेत.
पुणे कसोटीसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मो. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाला ८ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात ४६ धावांवर गारद झाला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला आणि ४०२ धावा केल्या.
यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने २ गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा केल्या आणि ८ गडी राखून विजय मिळवला.
संबंधित बातम्या