टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया ५ दिवसानंतर मायदेशी परतली. चक्री वादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकली होती. पण आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आज मायदेशात परतला. भारतात आल्यानंतर टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्यात आले.
टीम इंडिया आज म्हणजेच ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. या ठिकाणी पहाटे ४ वाजल्यापासून चाहते चॅम्पियन्स आणि ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत होते.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईत पोहोचला. मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे.
दरम्यान, टीम इंडिया दिल्लीहून विस्तारा एअरलाइन्सच्या खास विमानाने मुंबईत पोहोचली. या विमानाला खास नाव देण्यात आले. हे नाव रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जर्सीनंबर वरून देण्यात आले. रोहित आणि विराट आता टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
भारतीय संघ ज्या विमानातून प्रवास मुंबईत दाखल झाला, त्याला 'UK1845' असे नाव देण्यात आले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे जर्सी नंबर अनुक्रमे '१८' आणि ‘४५’ आहेत.
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या सन्मानार्थ विस्तारा एअरलाइन्सने या फ्लाइट ट्रिपला 'UK1845' असे नाव दिले. भारतीय संघाला घेऊन जाणारे हे विस्तारा विमान दुपारी २:५५वाजता दिल्लीहून निघाले आणि ५:२० वाजता मुंबईत उतरले.
भारतीय खेळाडूंसाठी आजचा खूप व्यस्त राहिला आहे. कारण सकाळी बार्बाडोसहून उतरल्यानंतर अवघ्या काही तासांनी संपूर्ण संघ पीएम मोदींच्या निवासस्थानी गेला, त्यांच्यासोबत नाश्ता केला आणि आता मुंबईत आला.
मुंबईत पोहोचल्यानंतरही भारतीय संघ खूप व्यस्त असणार आहे. विमानतळावरून संघाला त्या ठिकाणी नेले जाईल जिथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल. हा रोड शो मरीन ड्राईव्ह परिसरात होणार असून येथे ही टीम खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. यानंतर या मैदानावर एक खास कार्यक्रम होणार आहे. BCCI भारतीय संघातील खेळाडूंमध्ये १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करणार आहे.
संबंधित बातम्या