केरळमध्ये सध्या केरळ क्रिकेट लीगचा (KCL 2024) थरार सुरू आहे. या स्पर्धेत विष्णू विनोद याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. IPL २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या विष्णू विनोदने केरळ क्रिकेट लीगमध्ये खळबळ माजवली आहे.
तो या स्पर्धेत त्रिशूर टायटन्सकडून खेळत आहे. विनोदच्या या स्फोटक फलंदाजीनंतर तो चर्चेत आला आहे.
त्रिशूर टायटन्स आणि अलेप्पी रिपल यांच्यात झालेल्या सामन्यात विष्णू विनोदने ४५ चेंडूत १७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १३९ धावा केल्या.
या तुफानी डावात त्याचा स्ट्राइक रेट ३०८.८८ राहिला आहे. या खेळीत त्याने अवघ्या ३२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शानदार खेळीसाठी विष्णूला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.
या सामन्यात अलेप्पी रिपल प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संघाने २० षटकात ६ हबाद १८१ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९० धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशूर टायटन्सने केवळ १२.४ षटकांत विजयाची नोंद केली. विष्णू विनोदच्या १३९ धावांच्या खेळीमुळे त्रिशूर टायटन्सने त्यांच्यासमोर मोठे लक्ष्य असतानाही एकतर्फी विजय मिळवला.
विष्णू विनोदला आयपीएल २०२४ मध्ये दुखापत
विष्णू विनोद आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो मुंबईसाठी एकही सामना खेळू शकला नाही. विष्णूने २०२३ च्या आयपीएलमध्ये मुंबईसाठी ३ सामने खेळले. त्याने २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
विष्णूने आतापर्यंत एकूण ६ आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना त्याने ५६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३० होती.