Virat Kohli, Ranji Trophy : टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी भाग घेतला होता, पण केएल राहुल आणि विराट कोहली तंदुरुस्त नसल्यामुळे खेळू शकले नाहीत.
पण आता विराट कोहली ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. यासाठी डीडीसीएने विशेष तयारी केली आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
विराट त्याच्या होम टीम दिल्लीकडून खेळणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) विशेष तयारी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीडीसीएने या सामन्यात सुमारे १० हजार प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्याची योजना तयार केली आहे. नॉर्थ एंड आणि ओल्ड क्लब हाऊस प्रेक्षकांसाठी खुले केले जातील. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. सर्व प्रेक्षकांना या सामन्याचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे.
बीसीसीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे म्हटले होते. यानंतर अनेक स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले. आता विराटही खेळताना दिसणार आहे. विराटने शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये खेळला होता.
विराटने DDCA ला सांगितले होते की २३ जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही कारण त्याला मानदुखीचा त्रास झाला होता, परंतु त्याने सांगितले होते की तो ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध आहे.
आता विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी सामना खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी स्वतः अनेक मीडिया संस्थांना सांगितले की, विराटसाठी विशेष तयारी केली जात आहे. यावरून ३० जानेवारीपासून अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यात विराट खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातम्या