
India Tour South Africa, Virat Kohli : टीम इंडिया स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धची व्हाईट बॉल क्रिकेटची मालिका खेळणार नाही. कोहली वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, विराट कोहली हा नुकत्याच झालेल्या वनडे क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण आता भारतीय स्टार फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका रिपोर्टनुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला व्हाईट बॉलच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे संकते दिले आहेत. अशा प्रकारे तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल.
भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबरपासून ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेने होणार आहे.
त्यानंतर १७ डिसेंबरपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
एका सूत्राने सांगितले की, “कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले आहे की त्याला व्हाईट बॉलच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे आणि जेव्हा त्याला व्हाईट बॉलचे क्रिकेट खेळावे वाटेल तेव्हा तो परत येईल.
सध्या कोहलीने बीसीसीआयला सांगितले आहे की तो रेड बॉलचे क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहणार आहे.
भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, विराट कोहलीने अनेक विक्रम मोडले आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने ११ सामन्यांच्या ११ डावात ९५.६२च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. या दरम्यान त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. ७६५ धावांसह कोहलीने एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला.
संबंधित बातम्या
