Virat Kohli Vs Sachin Tendulkar ODI Stats : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू झाली. नागपुरात खेळलेला पहिला सामना भारतीय संघाने ४ विकेटने जिंकला होता, आता दुसरा वनडे सामना ९ फेब्रुवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ या मैदानावर ८ वर्षांनंतर एकदिवसीय सामना खेळणार आहे.
दरम्यान नागपूरात झालेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली खेळला नव्हता. पण आता कटक वनडेत तो खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. तो आता फॉर्ममध्ये परतण्यासाठी उत्सुक असेल. कोहलीने आतापर्यंत २९५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याची तुलना महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. कोहलीने सचिनचे अनेक विक्रम मोडले आहेत.
सचिनने आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले आणि ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या. एका खेळाडूने केलेल्या वनडेतील ही सर्वाधिक धावा आहेत.
२९५ एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीची तुलना केली तर कोहलीचे आकडे सचिनपेक्षा चांगले आहेत. सचिनने इतक्या सामन्यांमध्ये ११५०५ धावा केल्या होत्या. तर कोहलीने आतापर्यंत १३९०६धावा केल्या आहेत. सचिनची सरासरी ४४.४२ होती, तर कोहलीची सरासरी ५८.१८ आहे.
सचिनने २९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३ शतके आणि ५६ अर्धशतके केली होती. तर कोहलीने आतापर्यंत २९५ सामन्यांमध्ये ५० शतके आणि ७२ अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकावणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत शतक झळकावून त्याने हा विश्वविक्रम केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने २०० कसोटीत ५१ शतके आणि एकदिवसीय सामन्यात ४९ शतके झळकावली.
३६ वर्षीय कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत सचिनचा आणखी एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रम रचू शकतो. कोहलीला फक्त ९४ धावांची गरज आहे. सचिनने ३५० एकदिवसीय डावात हा आकडा गाठला होता.
या यादीत कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज संगाकरने ३७८ एकदिवसीय डावात १४००० धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात जलद ८०००, ९०००, १००००, ११०००, १२००० आणि १३००० वनडे धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यात १३ हजार वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. त्याने २६७ डावात ही कामगिरी केली होती.
संबंधित बातम्या