विराट कोहली हा रनमशीन म्हणून ओळखला जातो. पण नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो अतिशय वाईटपद्धतीने फ्लॉप झाला. ५ कसोटी मालिकेत त्याला सामन्यांच्या २३.७५ च्या सरासरीने फक्त १९० धावा करता आल्या. ८ डावात तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर त्याच्या टेक्निक आणि करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
यादरम्यान, विराटवर देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याची टीकाही झाली. रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांनी रोहित-कोहली यांना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, आता सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, विराट जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. यासाठी गरज भासल्यास कोहली आयपीएल २०२५ च्या काही सामन्यांनाही मुकणार आहे. व्हायरल होणाऱ्या या दाव्याचे सत्य काय आहे? ते आपण येणार जाणून घेणार आहोत.
इंग्लंडची देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन १ आणि २ एप्रिलमध्ये सुरू होईल. यादरम्यान आयपीएलचे सामनेही होणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे.
दुसरीकडे, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी कोहलीचे ऑस्ट्रेलियातील अपयश पाहता पुढील परदेश दौऱ्यावर विराटने कामगिरी सुधारण्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळावे, असा सल्ला दिला होता.
यानंतर विराट कोहली काउंटी क्रिकेट खेळणार, असे बोलले जात आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, ज्याच्या आधारावर विराट काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची खात्री करता येईल
त्याचवेळी, कोहलीसारख्या सुपरस्टारला आयपीएलमधून बाहेर ठेवणे हे थोडे कठीण वाटते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हे कधीच नकोसे असेल. त्यामुळे विराटची इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची शक्यता नगण्य वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी स्टार स्पोर्ट्सवर विश्लेषण करताना संजय मांजरेकर म्हणाले होते की, कोहलीला फलंदाजीबाबत तांत्रिक आणि आत्मविश्वासाच्या समस्या भेडसावत आहेत. त्याच्या ऑफ स्टंपची समस्या अशीच राहिली तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची स्थिती ऑस्ट्रेलियासारखीच होईल. विराटला सक्तीने निवृत्तही केले जाऊ शकते. त्यामुळे अनुभवी खेळाडूंना भारतीय संघात टिकायचे असेल तर त्यांना या समस्येतून बाहेर काढावे लागेल. हे दुरुस्त करण्यासाठी काउंटी क्रिकेट हा उत्तम पर्याय असेल. मांजरेकर यांनी हे वक्तव्य रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना उद्देशून केले होते.
संबंधित बातम्या