IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. पहिला कसोटी सामना ८ विकेटने हरल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला ११३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२६ ऑक्टोबर) विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हा त्याने काही चांगले फटके मारून भारतीय गोटात विजयाची आशा निर्माण केली होती. पण आऊट झाल्यावर जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये परतत होता, तेव्हा त्याचा राग शिगेला पोहोचला होता. रागाच्या भरात त्याने त्याची बॅट पाण्याच्या बाटल्या आणि बर्फ ठेवलेल्या बॉक्सवर आदळली.
विराटच्या या कृत्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना दिसत आहे. तेच, तेव्हा काही चाहत्यांनी त्याला 'हार्ड लक' म्हटले. त्यानंतर विराटने आपल्या बॅटने पाण्याच्या बाटल्यांनी भरलेल्या बॉक्सवर जोरदार प्रहार केला."
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने फक्त एक धाव करून फुलटॉस चेंडूवर क्लीन बोल्ड झाला होता, तर दुसऱ्या डावात तो केवळ १७ धावांचे योगदान देऊ शकला.
विशेष म्हणजे, विराट मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण त्याने रिव्ह्यू घेतला. यामध्ये अंपायरचा निर्णय अंपायर्स कॉल आला. त्यामुळे विराट चांगलाच संतापला. तो अंपायरकडे पाहत काहीतरी पुटपुटत तंबूच्या दिशेने गेला आणि शेवटी हे कृत्य केले.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ५ बाद १९८ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. परंतु भारतीय गोलंदाजांनी किवी संघाला पुढील ५७ धावांतच ऑलआउट केले. अशा प्रकारे भारताला चौथ्या डावात विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या डावात विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हा भारताने ९६ धावांवर दुसरी विकेट गमावली होती.
अशा स्थितीत टीम इंडियाला ६० ते ७० धावांच्या एका चांगल्या भागिदारीची गरज होती. पण संघाने ठाराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे टीम बॅकफूटवर गेली आणि शेवटच्या विकेटपर्यंत सावरू शकली नाही.
न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी गमावल्यानंतरही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताच्या गुणांची टक्केवारी ६२.८२ आहे, पण टीम इंडियाच्या सलग दोन पराभवांमुळे अंतिम फेरीत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण झाला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ६२.५० आहे.
संबंधित बातम्या