भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ चा दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथे खेळवला जात आहे. पहिला दिवस भारतीय संघासाठी चांगला नव्हता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये भारतीय खेळाडू कमाल करू शकले नाहीत.
विराट कोहलीसह सर्वच फलंदाज फ्लॉप झाला. पण क्षेत्ररक्षण करताना त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची जोरदार स्लेजिंग केली, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
वास्तविक, नॅथन मॅकस्विनी हा ऑस्ट्रेलियासाठी करिअरची दुसरी कसोटी खेळत असताना तो फलंदाजी करत होता. तर विराट कोहली खूप उत्साही दिसत होता. कारण भारतीय गोलंदाज फलंदाजांना सतत बीट करत होते. अशा परिस्थितीत, कोहलीने फलंदाजांना अधिक दडपणाखाली ठेवण्यासाठी स्लेजिंग करण्यास सुरुवात केली.
या दरम्यान जसप्रीत बुमराहचा एक चेंडू मॅकस्वीनीला बीट करत यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला तेव्हा विराट कोहलीने मॅकस्विनीला स्लेज केले. तो म्हणाला, 'जस (जसप्रीत बुमराह) त्याला काहीच समजत नाहीये.' त्याचे शब्द स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले आणि आता त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत ४४.१ षटकात १८० धावांवर ऑलआऊट झाला. नितीश कुमार रेड्डीने संघाकडून सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर केएल राहुल (३७ धावा) आणि शुभमन गिल (३१ धावा) यांनीही काही धावा केल्या.
या तीन फलंदाजांशिवाय कोणीही आपली छाप सोडू शकले नाही. आज सामन्याचा दुसरा दिवस असून हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले आहेत.
संबंधित बातम्या