बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा (१८ ऑक्टोबर) खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद २३१ धावा होती. आता पहिल्या डावाच्या आधारे भारत न्यूझीलंडपेक्षा १२५ धावांनी मागे आहे.
तिसऱ्या दिवशी भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी शानदार फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंमध्ये १३६ धावांची भागीदारी झाली.
विराट कोहलीने १०२ चेंडूत ६८ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीला बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्याच वेळी, सरफराज खान ७८ चेंडूत ७० धावा करून क्रीजवर आहे.
याआधी भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यात ७२ धावांची भागीदारी झाली होती. यशस्वी जैस्वाल ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालला एजाज पटेलने बाद केले. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ६३ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला.
रोहित शर्मा एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडकडून आतापर्यंत एजाज पटेलने २ बळी घेतले आहेत. तर ग्लेन फिलिप्सने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली.
न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर आटोपला. अशाप्रकारे किवी संघाला पहिल्या डावाच्या जोरावर ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक १३४ धावांची खेळी खेळली. तर सलामीवीर ड्वेन कॉनवेने ९१ धावा केल्या
याशिवाय टीम साऊदीने ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने ३-३ बळी घेतले. मोहम्मद सिराजला २ विकेट मिळाले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवी अश्विनला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. भारताकडून पहिल्या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांचे योगदान दिले.
पहिल्या डावात भारताचे ५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. याशिवाय भारताचे ९ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक ५ बळी घेतले. विल्यम ओरुकने ४ बळी घेतले.