सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. आज (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत.
टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली हा देखील या सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराटचा ताफा शहरात दाखल होताना दिसत आहे.
विराटसोबत हरभजन सिंगही भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचला आहे. भज्जीने त्याच्या एक्स अकाउंटवर फोटोही शेअर केले आहेत. यासोबतच सचिन तेंडुलकरही अयोध्येला रवाना झाला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
रामलल्लाच्या दर्शनासाठी विराट कोहली अयोध्येत पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट त्याच्या कारमध्ये अयोध्येला पोहोचल्याचे दिसत आहे. त्याचवेळी हरभजन सिंगने त्याच्या एक्स अकाउंटवर राम मंदिराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. भज्जीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राम मंदिर खूपच सुंदर दिसत आहे.
विराट व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, आर अश्विन, हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीला एक दिवसाची सुट्टी दिली होती. विराटला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान प्राण प्रतिष्ठाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. भारताला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळायची आहे. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी विराट हैदराबादमध्ये सराव करत होता. तो पुन्हा संघात सामील होणार आहे.
आदल्या दिवशी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आणि माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अयोध्येला रवाना झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. सचिन लवकरच अयोध्येत उतरणार आहे. त्याच्याशिवाय विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवही अयोध्येत पोहोचणार आहेत.