भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील अंतिम आणि तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी २३५धावा करून किवी संघ सर्वबाद झाला.
यानंतर टीम इंडिया खेळायला आली. भारतीय संघाने गोलंदाजीत कमाल केली. पण फलंदाजीत चांगली सुरुवात केल्यानंतर लागोपाठ ४ विकेट गमावल्या. या दरम्यान, विराट कोहलीही धावबाद झाला.
वास्तविक, रचिन रवींद्र न्यूझीलंडसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या डावातील १९ वे षटक टाकत होता. विराट कोहली त्याच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. त्याने सर्कलमध्येच एक हलका शॉट खेळला आणि एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला.
पण मॅट हेन्री चटकन चेंडूवर आला आणि त्याने चेंडू पकडून एका हाताने विराट कोहलीच्या एंडवर थ्रो केला.
कोहलीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिटनेस असलेल्या खेळाडूंपैकी एक मानले जाते. मात्र तो वेळेवर क्रीजवर पोहोचू शकला नाही. त्याने बचावासाठी डाइव्ह मारली. पण त्याचा उपयोग झाला नाही. तो हेन्रीच्या थेट थ्रोने धावबाद झाला. विराट कोहली कसोटी फॉर्मेटमध्ये चौथ्यांदा धावबाद झाला.
३५ वर्षीय विराट कोहलीची ही ६००वी आंतरराष्ट्रीय खेळी होती. मात्र, कोहलीला ही खेळी संस्मरणीय बनवता आली नाही आणि अवघ्या ४ धावांवर तो धावबाद झाला. या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली टीम इंडियासोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया विराट कोहलीवर खूप अवलंबून असेल.