भारताची २०१४-१५ ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका विराट कोहलीसाठी खूप संस्मरणीय होती. एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या दौऱ्यात कोहली कर्णधार आणि फलंदाज म्हणून खेळला होता. ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहली भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने त्या मालिकेत ६९२ धावा ठोकल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने ७६९ धावा केल्या होत्या.
कोहलीने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले होते. ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या पुढील सामन्यात कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. पण त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात त्याने मेलबर्न आणि सिडनी येथे शतक झळकावून चांगले पुनरागमन केले.
दरम्यान, सध्या भारताचा २०१४-१५ चा ऑस्ट्रेलिया दौरा चर्चेत आला आहे. कारण विराट कोहलीने त्या दौऱ्यातील काही आठवणी सांगितल्या आहेत. विराट आठवणी सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोहली कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनसोबत झालेल्या भांडणाची आठवण सांगताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली सांगतोय की, कसोटी मालिकेच्या दोन महिने आधापासून मी जॉन्सनला कसे खेळणार, याचा विचार करत होतो. पण सामन्यादरम्यान जॉन्सनचा पहिलाच चेंडू माझ्या डोक्याला लागला. त्यावेळी माझे सर्व प्लॅन उद्ध्वस्त झाले होते. माझा डावा डोळा सुजला होता, पण मी त्यावेळी त्याकडे लक्ष दिले नाही.'
कोहली पुढे म्हणाला की, जेव्हा मी लंच ब्रेकमध्ये ड्रेसिंग रुममध्ये गेलो, तेव्हा मी विचार केला नव्हता की, मी हे करेन किंवा तसे करेन. पण माझ्या मनात एक गोष्ट होती, की त्याने माझ्या डोक्यात चेंडू मारलाच कसा! त्यावेळी मी ठरवलं की आता या मालिकेत मी त्याला खूप चोपणार, आणि मी तसे करून दाखवले."
विराट कोहली सध्या आयपीएल २०२४ मध्ये व्यस्त आहे. आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी यंदाचे आयपीएल खूप महत्वाचे आहे. कारण या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारेच वर्ल्डकपचा संघ ठरणार आहे.
विशेष म्हणजे, आतापर्यंत विराट कोहली हाच आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना ६ सामन्यात ३१९ धावा केल्या आहेत. कोहलीने ७९.७५ च्या सरासरीने आणि १४१.७७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच, मानाची ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे.
संबंधित बातम्या