Virat Kohli : रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार; विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार; विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय?

Virat Kohli : रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार; विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय?

Published Feb 13, 2025 02:36 PM IST

Virat Kohli on Rajat Patidar : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं आयपीएलच्या पुढील हंगामासाठी रजत पाटीदारची कर्णधार म्हणून निवड केली आहे. त्यावर विराट कोहलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार, या निवडीवर काय म्हणाला विराट कोहली?
रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार, या निवडीवर काय म्हणाला विराट कोहली?

Virat Kohli Praises Rajat Patidar : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा नवा कर्णधार म्हणून रजत पाटीदार याची निवड झाली आहे. विराट कोहलीला पुन्हा एकदा संधी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र संघ व्यवस्थापनानं नवा चेहरा निवडला आहे. या निर्णयावर विराट कोहलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

रजत पाटीदारच्या निवडीवर विराट कोहली यानं आनंद व्यक्त केला आहे. मी पाटीदारच्या पाठीशी राहीन आणि आयपीएलचं विजेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेन, असं विराटनं म्हटलं आहे.

विराटनं रजतचं अभिनंदन केलं आहे. या संघातील तुझी वाटचाल आणि कामगिरी खूपच उजवी राहिली आहे. आरसीबीच्या सर्व चाहत्यांच्या मनात तू स्वत:चं स्थान निर्माण केलं आहेस. तुला खेळताना पाहण्यासाठी ते खरोखरच उत्सुक असतात. त्यामुळं तुझा हा हक्क होता. माझ्यासह संघाचे सर्व सदस्य तुझ्या पाठीशी असतील, असं विराटनं एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.

आरसीबीचं नऊ वर्षे कर्णधारपद भूषवणाऱ्या आणि २०१६ च्या अंतिम फेरीपर्यंत (फ्रँचायझीच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा) नेतृत्व करणाऱ्या कोहलीनं आयपीएल २०२२ च्या हंगामाआधी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ड्युप्लेसिस व आता रजत पाटीदारला संधी मिळाली आहे.

ही जबाबदारी मोठी!

'रजत पाटीदारनं त्याच्या कामगिरीनं आरसीबीचं नेतृत्व करण्याचा अधिकार मिळवला आहे. अर्थात ही मोठी जबाबदारी आहे. गेली अनेक वर्षे मी ही जबाबदारी सांभाळलीय. फाफ ड्युप्लेसिसनंही तीन वर्षे ती जबाबदारी सांभाळली. संघाला पुढं नेणारा माणूस म्हणून आपल्याकडं पाहिलं जाणं हा खूप मोठा सन्मान असतो. रजतच्या निवडीचा मला आनंद आहे. मी गेल्या काही वर्षांत त्याला एक उत्तम खेळाडू म्हणून स्वत:मध्ये सुधारणा करताना पाहिलंय. त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे, असं विराट म्हणाला.

विराटचं आरसीबीच्या चाहत्यांना आवाहन

गेल्या काही वर्षांत त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. ज्या प्रकारे त्यानं आपल्या राज्य संघाचं नेतृत्व केलं आहे, ते पाहता तो नव्या जबाबदारीलाही योग्य न्याय देईल. नेतृत्व करण्याचे सर्व गुण त्याच्याकडं आहेत. माझ्या त्याला शुभेच्छा आहेत आणि सर्व चाहत्यांनीही त्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन विराट कोहलीनं केलं आहे.

'रजत संघासाठी आणि फ्रँचायझीसाठी जे काही योग्य असेल ते करेल याची मला खात्री आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याला पाठिंबा द्यायला हवा. संघ आणि फ्रँचायझी महत्त्वाची आहे. संघाच्या आणि फ्रँचायझीच्या वाढीची आणि प्रगतीची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. रजतनं मोसमाची सुरुवात धडाकेबाज करावी अशी अपेक्षा आणि उत्सुकताही आहे, असंही विराटनं म्हटलं आहे.

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या